ग्रामपंचायत निवडणुकीचे गावागावातील चित्र : भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची सरळ लढत : अनेक गावात अपक्षांचे आव्हान
वार्ताहर / निपाणी
ग्रा. पं. निवडणुकीमुळे गावागावात राजकारण तापले आहे. जिंकण्याची इर्षा प्रत्येकात निर्माण झाल्याने उमेदवारांसह स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना बोचऱया थंडीतही घाम फुटू लागला आहे. या सर्व प्रचाराच्या रणधुमाळीत आतापासूनच कोण जिंकणार?, कोणाला पराभवाला सामोरे जावे लागणार याविषयी तर्क-वितर्क लढविले जात आहेत. अनेक ग्रामपंचायतीमध्ये काँटे की टक्कर अनुभवायला मिळत आहे. असे असले तरी कौल कोणाला? याचा किंगमेकर मतदार राजाच ठरणार हे स्पष्ट आहे.
जत्राट ग्रा. पं. साठी काँटे की टक्कर
जत्राट व श्रीपेवाडी अशा दोन गावांची आणि पाच प्रभागांची ग्रा. पं. म्हणजे जत्राट. या ग्रा. पं. साठी 20 सदस्य निवडले जाणार असून यासाठी भाजप व काँग्रेस पुरस्कृत आघाडीचे प्रत्येकी 20 व अपक्ष 2 असे एकूण 42 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या कार्यकाळात या ग्रा. पं. वर काँग्रेस तिसरी आघाडी अशा युतीची सत्ता होती. भाजप सत्तेपासून दूर होता. यामुळे भाजपने हे सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी व्यूहरचना केली आहे. तर काँग्रेसने आपला सत्तेचा झेंडा अबाधित ठेवण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीने प्रचार सुरू असून काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.
लखनापूर ग्रा. पं. मध्ये भाजपसमोर आव्हान
लखनापूर व पडलिहाळ अशा दोन गावांची ग्रुप ग्रा. पं. असणाऱया लखनापूरसाठी सदस्य संख्या 10 आहे. या ग्रा. पं. वर अधिकतर वर्षे भाजप आघाडीचेच वर्चस्व आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातही भाजपचीच सत्ता होती. ही सत्ता ओढून घेण्यासाठी दोन्ही गावात काँग्रेस आघाडीने कंबर कसली असून भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. यामुळे भाजपने ही सत्ता टिकविण्याचे प्रयत्न चालविले असून कोण सत्ता काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक हाती सत्तेसाठी यमगर्णी ग्रा. पं. चुरस
यमगर्णी, बुदिहाळ, नांगनूर अशा तीन गावांचा समावेश असणाऱया यमगर्णी ग्रा. पं. साठी तिन्ही गावात चुरस आहे. भाजप-काँग्रेस पुरस्कृत आघाडय़ांमध्ये सरळ लढत असली तरी अपक्षांनीही आव्हान निर्माण केले आहे. यमगर्णीत 9 जागांसाठी 21 उमेदवार, बुदिहाळमध्ये 6 जागांसाठी 18 उमेदवार, नांगनूरमध्ये 7 जागांसाठी 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ग्रा. पं. वर गेल्या कार्यकाळात नमो-काँग्रेस युतीची सत्ता होती. ही युतीची सत्ता मागे टाकून एकहाती सत्तेकरिता भाजप व काँग्रेसमध्ये चुरस लागली आहे. यामध्ये अपक्ष उमेदवारांवरच विजयाचे समीकरण ठरणार हे स्पष्ट आहे.
कोडणीत काँग्रेस, भाजपमध्ये चुरस
कोडणी, गायकवाडी अशा दोन गावांचा समावेश असणाऱया कोडणी ग्रा. पं. वर गेल्या निवडणुकीत भाजप आघाडीची असणारी सत्ता खेचून काँग्रेस आघाडीने एकहाती सत्ता मिळविली होती. भाजप आघाडीने यावेळी मागील चुका सुधारण्याचा प्रयत्न करत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर काँग्रेसने आपली सत्ता टिकविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे काँग्रेस व भाजपात सत्तेसाठी मीच पुढे ची चुरस दिसत आहे. गायकवाडी यामध्ये किंगमेकर ठरेल, असेही मानले जात आहे.
मतांसाठी उमेदवारांकडून मतदारांपुढे दंडवत…
रविवार दि. 27 रोजी मतदान होणार असून मतदार मतदान करताना उमेदवारांचे भवितव्य पेटी बंद करणार आहे. या प्रक्रियेला अवघे दोन दिवस राहिल्याने उमेदवारांसह स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मतदाराला आपलसं करण्यासाठी कधीही मतदाराच्या समस्या जाणून घेणारेही मतासाठी मतदारांपुढे दंडवत घालत आहेत. यामुळे सर्वत्रच एक आपुलकीच्या नात्याचा महापूर आल्याचे दिसत आहे. पण मतदार राजा हे सर्व जाणून असून पात्र उमेदवार कोण याची चाचपणी करत आहे. ही चाचपणीच उमेदवारांसाठी अग्निपरीक्षा ठरत आहे.