रस्त्यांवर खेकडय़ांचा कब्जा :पायी चालणे देखील अवघड
क्यूबाच्या दक्षिण समुद्र किनाऱयावर वेगाने मायग्रेटिंग क्रॅब्स (खेकडे)ची संख्या वाढत असल्याने स्थानिक लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे खेकडे पूर्वी रस्त्यांवर अधिक प्रमाणात दिसून येत नव्हते, परंतु कोरोना लॉकडाउनदरम्यान रिकामी जागा मिळाल्याने हे खेकडे बाहेर पडू लागले आहेत.
आता हे खेकडे क्यूबाच्या रस्त्यांवर फिरू लागले आहेत. पाऊस सुरू जाल्यावर लाखो लाल, पिवळय़ा आणि काळय़ा रंगाचे खेकडे जमिनीतून बाहेर पडत असून सकाळ-संध्याकाळ रस्त्यांवर त्यांची फौज हिंडत असते. आता लोकांकडे कुठलाच मार्ग राहिलेला नाही. काही खेकडे वाहनांखाली चिरडले जातात तर काही पायांखाली सापडून जीव गमावत आहेत.
आणखीन वाढू शकते संख्या
क्यूबाच्या पर्यावरण मंत्रालयानुसार कोरोना काळापासून खेकडय़ांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच यांच्या संख्येत आणखीन वाढ होण्याची अपेक्षा आहे. परंतु जगभरातील वैज्ञानिकांनी यासंबंधी पुष्टी दिलेली नाही.
रस्त्यांवर खेकडेच खेकडे
हे खेकडे कुठलेही वाहन, बस, घराच्या भिंती आणि समुद्रकिनाऱयानजीक दिसून येत आहेत. रस्त्यांवर त्यांचे प्रमाण अधिक असल्याने दूरवरून पाहिल्यास जणू खेकडय़ांचा गालिचा अंथरला आहे असे वाटू लागते. खेकडय़ांच्या कब्जाने सर्वाधिक प्रभावित भाग बे ऑफ पिग्स आहे. हे खेकडे या भागात दरवर्षी येत असतात. परंतु यंदा त्यांचे आगमन लवकर झाल्याने स्थानिक प्रशास आणि लोकांनी याकरता तयारी केली नव्हती. हिवाळय़ापासून दिलासा मिळावा म्हणून क्यूबातील पावसाळय़ाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक जगातील सर्वात मोठय़ा विस्थापनामुळे त्रस्त आहेत.