ऑनलाईन टीम / मुंबई :
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका क्राईम पेट्रोल मधील अभिनेते शफीक अन्सारी यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. शफीक गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. मात्र, 10 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती सिने आणि टीव्ही कलाकार संघटनेकडून (सीआयएनटीएए) ही माहिती ट्विटरवरून दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शफीक हे सीआयएनटीएए या संघटनेचे सदस्य होते. गेले काही दिवस शफीक हे कॅन्सरशी लढा देत होते. रविवारी अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी गौहर आणि तीन मुली आहेत.
शफीक यांची क्राइम पेट्रोल मधील भूमिका लोकप्रिय होती. तसेच ते क्राइम पेट्रोल या मालिकेचे असिस्टंट डायरेक्टर आणि लेखक देखील होते. 2003 मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांच्या बागबान या चित्रपटासाठी स्क्रीन रायटर म्हणून काम केले होते.