क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
प्रत्येक सदस्याने त्याची संघातील भुमिका जाणून घ्यावी आणि सातत्याने ती अंमलात आणावी. क्रिकेटपटूंनी त्यांच्या वैयक्तिक आणि सांघिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला काल गोवा सीनियर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक भास्कर पिल्ले यांनी गोव्याच्या संभाव्य रणजीपटूंना दिला.
काल पर्वरी क्रिकेट अकादमीवर भास्कर पिल्ले यांनी सराव संपल्यानंतर क्रिकेटपटूंशी संवाद साधला. फिटनेस, फिल्डिंग आणि कौशल्य हे सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये यशाचं गमक आहे. पूर्वी कौशल्य, फिल्डींग आणि फिटनेस असे उलटं होतं. आता क्रिकेटचं स्वरूप बदलले आहे, असे दिल्ली आणि त्रिपुरा संघांना प्रशिक्षण दिलेले भास्कर पिल्ले म्हणाले.
गोव्याच्या सध्या संभाव्य क्रिकेटपटूंत मोठी नावे नाहीत. पण यातून चिंता करण्याची काहीच गरज नाही. सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि आम्ही एक संघ म्हणून खेळलो आणि प्रत्येकांनी आपली जबाबदारी ओळखून संघासाठी वैयक्तिक योगदान दिले तर आम्ही बलाढय़ संघांनाही पराभूत करून शकतो, असे पिल्ले म्हणाले.
गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विपुल फडके, क्रिकेट संचालक प्रकाश मयेकर तसेच सीनियर संघ निवड समितीच्या सदस्यांबरोबर सखोल चर्चा पिल्ले यांनी केली. आज रविवारी ते दिल्लीला परत जाणार असून, तेथून थेट पुडिचेरीला रवाना होतील. भास्कर पिल्ले हे अनुभवी क्रिकेट प्रशिक्षक आहेत. राष्ट्रीय स्तरावरील गोव्याचा क्रिकेटचा आलेख आम्हाला वाढवायचा आहे आणि यासाठी अनुभवी क्रिकेट प्रशिक्षक भास्कर पिल्ले यांची नियुक्ती आम्ही केली असल्याचे फडके म्हणाले. विविध वयोगटातील क्रिकेट संघांना त्यांनी प्रशिक्षण दिले असून आम्ही त्यांच्याकडे दिर्घ पल्ल्याचा प्रशिक्षण करार करण्याच्या विचारात असल्याचे फडके म्हणाले.
गोवा क्रिकेट संघटनेने आपल्या क्रिकेटपटूंना सराव मिळावा यासाठी पुडिचेरीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुडिचेरीत टी-20, एकदिवशीय आणि दोन दिवशीय सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात काही क्रिकेट संघटनेंच्या संघांचा समावेश आहे. गोव्याचे संभाव्य 26 क्रिकेटपटू यासाठी 20 ऑगस्टला पुडिचेरीला रवाना होतील.
पुडिचेरीला रवाना होणारे क्रिकेटपटू याप्रमाणेः आदित्य कौशिक, अमोघ देसाई, इशान गडेकर, निहाल सुर्लकर, सुमिरन आमोणकर, वैभव गोवेकर, स्नेहल कवठणकर, समीत आर्यन मिश्रा, मंथन खुटकर, दिपराज गावकर, विशंभर कॅहलोन, राजशेखर हरिकांत, समर दुभाषी, हेरंब परब, लक्षय गर्ग, ऋत्विक नाईक, फॅलिक्स आलेमाव, अमुल्य पांड्रेकर, दर्शन मिसाळ, मलिकसाब शिरुर, एकनाथ केरकर, वीजेश प्रभुदेसाई, मोहित रेडकर, सुयश प्रभुदेसाई, अमित यादव व हर्षद गडेकर.