प्रवीण तांबे यांच्यावर येतोय चित्रपट
अभिनेता श्रेयस तळपदेने भारतीय क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा बायोपिक ‘कोन प्रवीण तांबे’चे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंसह प्रवीण तांबे यांच्या रुपात अभिनेत्याचे छायाचित्र पोस्टरमध्ये दिसून येते. या पोस्टरला सोशल मीडियावर शेअर करत श्रेयसने क्रिकेटचा सर्वात अनुभवी पदार्पणवीर आणि सर्वात प्रेरक क्रिकेटपटूची कहाणी कधीच सांगण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.
इक्बालमध्ये मुख्य भूमिका साकारल्यावर 17 वर्षांनी मी पडद्यावर प्रवीण यांची व्यक्तिरेखा साकारत असल्याने स्वतःला सुदैवी मानतो. या चित्रपटातील भूमिका आणि कहाणीने मला नवी संधी दिली असल्याचे श्रेयसने म्हटले आहे. बूटरुम स्पोर्ट्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओजकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर जयप्रद यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
प्रवीण तांबे यांनी वयाच्या 41 व्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पदार्पण केले होते. किरण यज्ञोपवित यांची पटकथा असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगूत 1 एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.