वृत्तसंस्था/ चंदीगड
चंदीगड रणजी क्रिकेट संघातील दोन वरिष्ठ क्रिकेटपटू रमण बिस्नोई आणि श्रेष्ठ निर्मोही यांना कोरोनाची झाली असल्याचे चाचणीत आढळून आले. आगामी सदस्य मुश्ताक अली लीग टी-20 स्पर्धेसाठी चंदीगड संघाचे सराव शिबीर सुरू आहे.
चंदीगड संघातील वेगवान गोलंदाज निर्मोही आणि मध्यफळीतील फलंदाज बिस्नोई यांची सराव शिबिराच्या प्रारंभी कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार तातडीने सुरू केले असून ते यातून लवकर बरे झाले नाही तर चंदीगड संघाला फार मोठा धक्का बसू शकेल. मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत प्लेट विभागात ते आघाडीच्या स्थानासाठी फेव्हरेट म्हणून ओळखले जातात. पुढील आठवडय़ात त्यांची दुसरी चाचणीत घेतली जाणार आहे. त्यात ते निगेटिव्ह आले तरच त्यांना संघासोबत पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत प्लेट गटातील चंदीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम आणि अरूणाचलप्रदेश या संघांचे सामने चेन्नईमध्ये खेळविले जाणार आहेत. 2 जानेवारीपूर्वी या संघातील सर्व खेळाडू त्यांच्या यजमान शहरामध्ये एकत्रित येतील. 2, 4, 6 जानेवारीला या सर्व क्रिकेटपटूंची कोरोनाची तीनवेळा चाचणी घेतली जाईल. येथील सेक्टर-16 क्रिकेट स्टेडियममध्ये सध्या चंदीगड संघाचे सराव शिबीर सुरू आहे.