वृत्तसंस्था/ मेलबोर्न
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विद्यमान प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) केव्हिन रॉबर्टस् यांची या पदावरून लवकरच उचलबांगडी केली जाणार असून त्यांच्या जागी हंगामी सीईओची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते. कोरोना महामारी संकटाच्या कालावधीत सीएच्या मुख्यालयातील 80 टक्के स्टाफला सुटी देत कारभार चालविल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱयांनी रॉबर्टस् यांचा पाठिंबा काढून घेतला असून त्यांची या पदावरून लवकरच उचलबांगडी केली जाईल. रविवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या सदस्यांची तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये रॉबर्टस् यांच्या जागी हंगामी व्यक्तीची नियुक्ती करून त्यांच्याकडे सर्व जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर माहिती ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रानी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान हंगामी सीईओपदी कोणत्या व्यक्तीची निवड केली जाईल हे मात्र गुपीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. कोरोना महामारी समस्येमुळे गेल्या महिनाभराच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला सुमारे 54.55 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणारी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र डिसेंबर महिन्यातील भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित होईल, असे सांगण्यात आले.