वृत्तसंस्था/ सिडनी :
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2020-21 हंगामात मध्यवर्ती करारात समाविष्ट असलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मार्नस लाबुशाने आणि जो बर्न्ससहित 6 नवीन चेहऱयांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अनुभवी उस्मान ख्वाजा व शॉन मार्श यांना या नव्या करारात जागा मिळालेली नाही. शनिवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ही यादी जाहीर करण्यात आली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नवीन केंद्रीय कराराच्या यादीमध्ये 20 पुरुष आणि 15 महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हा करार पुढील एका वर्षासाठी असेल. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया लाबुशानेने मागील दोन वर्षात दमदार कामगिरी साकारली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत तो तिसऱया स्थानी विराजमान आहे. त्याने 14 कसोटीत 63 च्या सरासरीने 4 शतकासह 1459 धावा जमवल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर लाबुशानेला मध्यवर्ती करार यादीत स्थान देण्यात आले असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते ट्रेवर हॉन्स यांनी सांगितले. तसेच युवा खेळाडू जो बर्न्सलाही दमदार कामगिरीच्या जोरावर या यादीत स्थान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता
गत पाच वर्षांत उस्मान ख्वाजा व शॉन मार्श प्रथमच या यादीतून बाहेर पडले आहेत. ख्वाजा, मार्शशिवाय पीटर हँडस्कॉम्ब, मार्कस हॅरिस, नॅथन कोल्टर नाईल आणि मार्कस स्टोईनिस यांनाही या यादीतून वगळण्यात आले आहे.
करारामध्ये त्यांची जागा लाबुशाने, ऍश्टन ऍगर, जो बर्न्स, मिशेल मार्श, केन रिचर्डसन व मॅथ्यू वेड यांनी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंच्या यादीत युवा फलंदाज तहलिया मॅकग्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मॅकग्राने गतवर्षी ऑस्ट्रेलिया अ संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी साकारणाऱया ऍनाबेल सदरलँडचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. अनुभवी फलंदाज निकोल बोल्टन आणि एलिस व्हिलानी यांना मध्यवर्ती करारात स्थान मिळवता आलेले नाही.