वृत्तसंस्था/ मेलबोर्न
कोरोना व्हायरस महामारीने ऑस्ट्रेलियातील आर्थिक स्थितीवरही विपरित परिणाम झालेला आहे. या संकटामुळे ऑस्ट्रेलियातील सर्व क्रिकेट स्पर्धा जूनअखेरपर्यंत रद्द करण्यात आल्या असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या काही कर्मचाऱयांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. आता या कर्मचाऱयांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यासाठी हंगामी नोकऱया मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियातील बऱयाच क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला रेव्हिन्यूपासून वंचित व्हावे लागत आहे. ऑस्ट्रेलियन शासनाच्या जॉब किपर सहाय्य कार्यक्रमाचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फारसा उपयोग होत नसल्याचे आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या आपल्या काही कर्मचाऱयांना तात्पुरत्या नोकऱया मिळवून देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सुपर मार्केटमधील आघाडीचे स्पॉन्सर्स वूलवर्थस् यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात वूलवर्थस्चे सीईओ ब्रॅड बेंडूसी यांना लेखी पत्र पाठविल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यकारी केव्हिन रॉबर्टस् यांनी सांगितले. सध्याच्या कालावधीत वूलवर्थस् आणि अन्य काही औद्योगिक संघटनांना अधिक कर्मचाऱयांची जरूरी भासत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियातील आगामी क्रिकेट हंगाम प्रेक्षकविना राहिला तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठय़ा आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल. प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विविध क्रिकेट स्पर्धेतून होणाऱया तिकीट विक्रीद्वारे सुमारे 40-50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची रक्कम मिळते पण कोरोना व्हायरस महामारीमुळे ऑस्ट्रेलियातील क्रिकेट हंगामावर साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियाला सध्याच्या कठीण अर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीत लवकरच सुधारणा घडेल, अशी आशा रॉबर्टस् यांनी व्यक्त केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे सध्या असलेल्या कर्मचाऱयांच्या नेहमीच्या वेतनामध्ये 20 टक्के कपात करण्यात आली आहे. क्रिकेट क्षेत्रात काही वेळा अस्थिरचा निर्माण होते पण पुढचा चेंडू कसा येतो याचा विचार क्रिकेटपटू नेहमीच करीत असतो. आता अशी परिस्थिती सर्वच क्षेत्रामध्ये निर्माण झाली असून प्रत्येक व्यक्तीने आशावादी राहावे, असा सल्ला रॉबर्टस् यांनी दिला आहे.