वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष ख्रिस नेनझानी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय तडकाफडकीने घेतला आहे. नेनझानी हे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे गेली सात वर्षे अध्यक्ष होते. दरम्यान त्यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप वारंवार होत असल्याने त्यांनी आपले अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची वार्षिक सर्वसाधारण बैठक 5 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. या बैठकीपूर्वीच नेनझानी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा गेल्या शुक्रवारी मंडळाकडे सादर केला. नेनझानी यांना 2019 साली अध्यक्षपदाच्या मुदतीत एक वर्षांची वाढ करण्यात आली होती. 2013 पासून नेनझानी यांच्याकडे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या विकासामध्ये नेनझानी यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो. दरम्यान नेनझानी यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येवू लागले. गेल्या डिसेंबरमध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मोरो यांना बेशिस्त वर्तनाबद्दल निलंबित करण्यात आले होते. मोरो यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सीईओ जॅक्वीस फौल यांच्याशी गैरवर्तणूक केली हेती. या प्रकरणाचा गुंता अद्याप सुटलेला नसताना आता नेनझानी यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा प्रकरणाची भर पडली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथ यांच्याकडे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संचालकपदाची जबाबदारी 2022 मार्चपर्यंत टाकण्यात आली आहे.