चार प्रेक्षक जखमी ः मैदानात चेंगराचेंगरी
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाला. स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा सामना सुरू असतानाच हा स्फोट झाल्याने चेंगराचेंगरीही झाली. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झाली नसली तरी चार प्रेक्षक जखमी झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. शपेझा क्रिकेट लीग स्पर्धेवेळी ही घटना घडली असून स्फोटाचे व्हिडीओ फुटेज समोर आले आहे.
बँड-ए-आमिर ड्रगन्स विरुद्ध पामीर झाल्मी सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात कोणताही खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्फोटानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे बंकरमध्ये नेण्यात आले. हल्ल्यावेळी संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधीही स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. स्फोटानंतर स्टेडियममध्ये गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसून येत होते.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून दरवषी अफगाणिस्तानमध्ये शपेझा क्रिकेट लीग आयोजित केली जाते. स्पर्धेत आठ संघ खेळतात. यामध्ये राष्ट्रीय संघातील खेळाडू, अंडर-19 संघातील खेळाडू आदी सहभागी होतात.