नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे चालू आर्थिक वर्षाकरीता जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन दराच्या अंदाजात क्रिसीलने घट केली आहे. क्रिसीलने विकासदर यंदा 9.5 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सदरच्या एजन्सीने याआधी हा अंदाज 11 टक्के इतका वर्तवला होता. सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एजन्सीने आपल्या अंदाजात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असली तरी दुसऱया कोरोना लाटेमुळे पुन्हा तिच्या गतीत अडथळे जाणवत आहेत. आता कोरोनाचा असर कमी होत आहे, पण पहिल्यापेक्षा दुसऱया लाटेचा परिणाम अधिक नुकसानकारक ठरला आहे. तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारे लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्यास तत्पर दिसणार नाहीत, असेही क्रिसीलने म्हटले आहे. कोरोनाशी संबंधीत निर्बंध ऑगस्टपर्यंत जारी राहण्याची शक्यता असून वाहतुकही काही प्रमाणात का होईना विस्कळीत राहणार असल्याचे क्रिसीलने म्हटले आहे.