पालक ही अत्यंत पौष्टिक आणि गुणकारी भाजी. पालकपासून बरेच पदार्थ केले जातात. आलू पालक, पालक पनीर, पराठे, भजी असं बरंच काही केलं जातं. पालक खिचडी आणि पालक डाळही अनेकांना आवडते. मात्र पालकाचा एक वेगळा आणि चविष्ट पदार्थ तयार करता येईल. हा पदार्थ म्हणजे क्रिस्पी पालक. हॉटेलमध्ये क्रिस्पी पालक मिळतो. तुम्ही घरीही हा पदार्थ करू शकता.
साहित्य : 250 ग्रम पालक, अर्धा कप कॉर्न फ्लोर, आलं आणि लसणाचे तुकडे प्रत्येकी एक चमचा, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चार चमचे सोया सॉस, एक चमचा व्हिनेगार, चार चमचे तीळ, मीठ आणि तेल.
कृती : पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. आता हा चिरलेला पालक एका भांडय़ात ठेवा. त्यात कॉर्न फ्लोर मिसळा. पालकावर कॉर्न फ्लोर नीट लागायला हवं. यानंतर गॅसवर कढई ठेवा. त्यात तेल घाला. पालक नीट तळून घ्या. हा तळलेला पालक बाजूला ठेवा. यानंतर गॅसवर छोटी कढई किंवा फ्राय पॅन ठेवा. त्यात थोडं तेल घाला. त्यात आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून थोडं परतून घ्या. लसूण ब्राउन दिसू लागल्यावर त्यात सोया सॉस आणि व्हिनेगार घाला. हे मिश्रण तळलेल्या पालकात घाला आणि हलवून घ्या. शेवटी त्यात तीळ घालून हलक्या हातांनी हलवून घ्या. चवीनुसार मीठ घाला. क्रिस्पी पालक तयार आहे.