वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेतर्फे (नाडा) पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या मोबाईल ऍपचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याहस्ते मंगळवारी येथे करण्यात आले. या सुविधेमुळे ऍथलीटस्ना उत्तेजकां†िवषयी सविस्तर ताजी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. क्रीडाक्षेत्र संपूर्ण उत्तेजकविरहित करण्याच्या प्रक्रियेची ही पहिली पायरी आहे.
नाडाच्या या नव्या मोबाईल ऍपमुळे खेळाडूंना नव्याने निर्बंध घातलेल्या उत्तेजकांची माहिती उपलब्ध होईल. क्रीडाक्षेत्रातील नव्या घडामोडीची माहिती या ऍपतर्फे मिळू शकेल. हे ऍप म्हणजे नाडा आणि ऍथलीटस् यांच्यातील समन्वयसेतू असेल, असेही केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी म्हटले आहे. बऱयाच वेळा निर्बंध घातलेली द्रव्ये खेळाडूंकडून सेवन केली जातात आणि ते उत्तेजक चांचणीत दोषी ठरतात. त्यांच्या ऍथलेटिक कारकीर्दीवर विपरित परिणाम होवू शकतो. भारतीय क्रीडाक्षेत्र संपूर्ण पारदर्शक आणि स्वच्छ बनविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे रिजिजु यांनी म्हटले आहे. नाडाच्या या पहिल्या मोबाईल ऍपचे केंद्रीय क्रीडामंत्री रिजिजू यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे उद्घाटन करण्यात आले. या ऍपमध्ये खेळाडूंसाठी निर्बंधित उत्तेजकांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून आता प्रशिक्षकाकडून खेळाडूंना विशिष्ट औषधांचे मार्गदर्शन करताना या ऍपचा खूपच उपयोग होणार आहे. देशातील सर्व ऍथलीटस् आणि प्रशिक्षकांसाठी नाडाचा हा नवा इंडिया ऍप गुगलवर स्टोअर करण्यात आला असून हा ऍप खेळाडूंनी डाऊनलोड करून घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. या समारंभावेळी क्रीडा सचिव रवि मित्तल आणि नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल उपस्थित होते.