चहापानापर्यंत विंडीजच्या पहिल्या डावात 4 बाद 227 धावा, करनचे 2 बळी
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत विंडीजने चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 76 षटकांत 4 बाद 227 धावा जमविल्या होत्या. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अद्याप 43 धावांची जरूरी होती. क्रेग बेथवेट व ब्रूक्स यांनी शानदार अर्धशतके नोंदवली.
विंडीजने पहिली कसोटी जिंकून या मालिकेत आघाडी घेतली असल्याने इंग्लंड हा सामना जिंकून बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही, अशी लक्षणे दिसत आहेत. या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजने दुसऱया दिवशीअखेर 1 बाद 32 धावा जमविल्या होत्या. पण तिसऱया दिवशी पावसामुळे पूर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. विंडीजने या धावसंख्येवरून चौथ्या दिवशी खेळ पुढे सुरू केला आणि उपाहारापर्यंत एक बळी गमवित 86 धावांची भर घातली. फिरकी गोलंदाज डॉम बेसने या सत्रात एकमेव यश मिळविताना नाईट वॉचमन अल्झारी जोसेफला 32 धावांवर पोपकरवी झेलबाद केले. जोसेफने सलामीवीर ब्रेथवेटला चांगली साथ देत दुसऱया गडय़ासाठी 54 धावांची अर्धशतकी भागीदारी केली.
फॉलोऑन टाळणे हे विंडीजचे पहिले उद्दिष्ट असून 270 धावांकडे त्यांनी हळूहळू वाटचाल केली होती. यात ते यशस्वी ठरल्यास इंग्लंडचे काम आणखी कठीण होणार आहे. उपाहारास खेळ थांबला तेव्हा ब्रेथवेट 41 व शाय होप 25 धावांवर खेळत होते. या दोघांनी यावेळपर्यंत 48 धावांची भागीदारी केली होती. उपाहारानंतरच्या सत्रात होप फारवेळ टिकला नाही. ब्रेथवेटने अर्धशतक पूर्ण केले तर होप 25 धावांवरच बाद झाला. त्याने 71 चेंडूत 5 चौकार मारले आणि ब्रेथवेटसमवेत 53 धावांची भागीदारी केली. ब्रेथवेटला नंतर ब्रूक्सकडून चांगली साथ मिळाली. त्यांनी सावध खेळ करीत चौथ्या गडय़ासाठी 72 धावांची भर घातल्यावर ब्रेथवेट 75 धावांवर बाद झाला. 165 चेंडूत त्याने 8 चौकार मारले. ब्रूक्सनेही नंतर अर्धशतक पूर्ण केले. चहापानास खेळ थांबला तेव्हा ब्रूक्स 60 व रॉस्टन चेस 8 धावांवर खेळत होते. इंग्लंडच्या सॅम करनने 2 तर बेस व स्टोक्स यांनी एकेक बळी मिळविले होते.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 9 बाद 469 डाव घोषित, विंडीज प.डाव (चहापानापर्यंत) 76 षटकांत 4 बाद 227 : ब्रेथवेट 76 (165 चेंडूत 8 चौकार), कॅम्पबेल 12 (34 चेंडूत 2 चौकार), अल्झारी जोसेफ 32 (52 चेंडूत 3 चौकार), शाय होप 25 (71 चेंडूत 5 चौकार), ब्रूक्स खेळत आहे 60 (115 चेंडूत 10 चौकार), रॉस्टन चेस खेळत आहे 8 (21 चेंडू), अवांतर 15. गोलंदाजी : सॅम करन 2-35, बेस 1-59, स्टोक्स 1-22.