घर-इमारतींची पडझड : अनेक जण जखमी
वृत्तसंस्था / जगरेब
क्रोएशिया या युरोपीय देशाला मंगळवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. भूकंपामुळे देशात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर मोठय़ा संख्येत लोक जखमी झाले आहेत. राजधानीच्या दक्षिणपूर्व भागातील अनेक घरांची पडझड झाली आहे. राजधानी जगरेबपासून 46 किलोमीटर अंतरावर 6.4 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिली आहे.
भूकंपामुळे क्रोएशियाचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. तर काही इमारतींच्या भिंती तसेच छतांना तडे गेले आहेत. या नैसर्गि आपत्तीतील मृतांची नेमकी संख्या अद्याप प्राप्त झालेली नाही, परंतु हा आकडा वाढणार असल्याचे मानले जात आहे. मदत तसेच बचावकार्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. याच भागात सोमवारी 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता.
कारवर कोसळली इमारत
भूकंपानंतर क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविक आणि काही मंत्री स्थितीचा आढावा घेण्यासाठी पेट्रिंजा शहरात पोहोचले. भूकंपाने सर्वाधिक प्रभावित पेट्रिंजा शहरात एक इमारत कारवर कोसळली आहे. ढिगारा हटविल्यावर कारमध्ये अडकून पडलेल्या एका व्यक्तीला त्याच्या मुलासह रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भूकंपानंतर राजधानी जगरेबमध्ये लोक घरांमधून बाहेर पडत रस्ते आणि उद्यानाच्या दिशेने धावले आहेत.
शेजारी देशांमध्येही प्रभाव
कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधानंतरही अनेक जणांनी जगरेबपासून अन्य ठिकाणी धाव घेतली आहे. शेजारी देश असलेल्या सर्बिया, बोस्निया आणि स्लोवेनियामध्येही भूकंपाचा झटका जाणवला आहे. भूकंपानंतर क्रस्को अणुऊर्जा प्रकल्प तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. सीमेनजीकच्या या प्रकल्पाचे नियंत्रण स्लोवेनिया आणि क्रोएशियानजीक आहे.