प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील काही रस्त्यांचा विकास झाला आहे, काही रस्ते अर्धवट आहेत. या अर्धवट रस्ताकामामुळे वाहनधारकांना समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. मात्र पर्यायी मार्गाचीदेखील वाताहत झाल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढलेली आहे.
येथील क्लब रोड जीएसटी भवनजवळील रस्त्याची वाताहत झाली आहे. येथील रस्ता सुस्थितीत असला तरी जीएसटी भवनच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या मार्गावरील डांबर जाऊन खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी वाहनधारकांना खड्डय़ांतून मार्ग काढावा लागत आहे. एखादे वाहन या मार्गावरून वेगाने गेल्यास खड्डय़ांचा अंदाज न आल्याने मधोमध ब्रेक लावावा लागत आहे. त्यामुळे मागून येणाऱया वाहनांची धडक बसून अपघात घडत आहेत.
क्लब रोडवरील आरबीएल बँक ते सीपीएड ग्राउंडपर्यंतच्या रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात येत आहे. सध्या हे काम अर्धवट आहे. यामुळे वाहतूक दुसऱया बाजूने वळविण्यात आली आहे. मात्र, वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक क्लब रोड जीएसटी भवनजवळून ये-जा करत आहेत. मात्र, येथील रस्त्याचीही दूरवस्था झाली असून खड्डय़ांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे एखादा अनर्थ घडण्यापूर्वी येथील रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.