बदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका, ऊन, पाऊस, ढगाळ हवामानाचा फटका, चिमुकल्यांसह ज्येष्ठांचे आरोग्य बिघडले,
सर्दी, खोकल्याने वाढली कोरोनाची धास्ती
प्रतिनिधी / कोल्हापूर
कडाक्याचे ऊन अन् जोरदार पाऊस..मध्येच ढगाळ वातावरण.. अशा बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांच्या आरोग्याला बसला आहे. महागाईत क्लायमेट चेंज'च्या
हेल्थ फिव्हर’ने वैद्यकीय खर्चात वाढ झाली आहे. घरातील चिमुकल्यांसह ज्येष्ठांचे आरोग्य बिघडले आहे. त्यात सामान्य सर्दी, खोकल्याने कोरोनाच्या तिसऱया लाटेची धास्तीही वाढवली आहे. व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे ही कोरोनाशी साधर्म्य दर्शवणारी आहेत, त्यामुळे पालकांत तिसऱया लाटेची भीती व्यक्त होत आहे.
जुलैमधील अतिवृष्टी, महापुरानंतर ऑगस्टमध्ये श्रावणातील ऊनपावसाचे दर्शन झाले, पण त्यातही अधिकतर ढगाळ हवामानाने सामान्य रूग्ण वाढले होते. डेंग्यूसदृश्य तापाच्या रूग्णांत वाढ झाली. दुसरी लाट ओसरली तरी कोरोनाचे नवे रूग्ण आढळत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्याच सप्ताहात बदलत्या हवामानाने आरोग्यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांत शहर व परिसरासह जिल्हा कडाक्याचे ऊन अन् मधूनच कोसळणाऱया जलधारांचा अनुभव घेत आहे.
दिवसभरात अनेकदा जाणवणारे ढगाळ वातावरण घातक विषाणू, जीवांणूंच्या वाढीस पोषक आहे. त्यातून व्हायरल इन्फेक्शन'चा त्रास वाढला आहे. अचानक होणारी सर्दी, घसा बसणे, खवखवणे, कोरडा खोकला, कमालीच्या डोकेदुखीचा त्रास होणाऱया रूग्णांत वाढ झाली आहे. ऊन, पाऊस, ढगाळ हवामानाद्वारे दैनंदिन जीवनात अनेकांसाठी
व्हायरल इन्फेक्शन’ची डोकेदुखी त्रासदायक ठरली आहे.
ज्येष्ठांसह चिमुकल्यांमध्ये कॉमन फ्ल्यू, कोल्ड फ्ल्यूसह सर्दी, खोकल्याची लक्षणे वाढली आहेत. अशा रूग्णांनी क्लिनिकमधील गर्दी वाढली आहे. चिमुकल्यांमधील `व्हायरल फिव्हर’ने पालकांचे आरोग्य बिघडले आहेच. शिवाय वैद्यकीय खर्चामुळे महिन्यांचे बजेटही अडचणीत आले आहे. प्रिस्क्रिप्शन’वरील औषधांची यादी, चिमुकल्यांचा औषध घेण्यास नकार, औषधोपचारानंतरही सर्दी, खोकला कमी येण्यास उशीर लागत आहे. त्यातच दुसरी लाट ओसरत असताना तिसऱया लाटेचा झालेला गजर कोरोनाची धास्ती अधिक वाढवत आहे.
बालकांच्या नियमित लसीकरणावर लक्ष द्या : डॉ. शिशिर मिरगुंडे
बालरोगतज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे म्हणाले, बदलत्या हवामानामुळे सर्वसामान्य रूग्णांत वाढ झाली आहे. त्यात स्किन इन्फेक्शनचे रूग्णही वाढले आहेत. चिमुकल्यांना व्हायरल फिव्हरचा अधिक त्रास होत आहे. त्यामुळे पालकांनी चिमुकल्यांसह ज्येष्ठांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. बाहेर जाताना त्यांच्यासाठी उबदार कपडे वापरावेत, व्हायरल इन्फेक्शनची साथ आहे. त्याची लक्षणे बरीचशी कोरोनाशी साधर्म्य दर्शवणारी आहेत. त्यामुळे बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत, कोरोना तपासणी करतानाही त्यांचा सल्ला घ्यावा, फ्ल्यू, न्युमोनियाच्या नियमित लसीकरणावर पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.