ऑनलाईन टीम / सातारा :
वाठार बुद्रुक ता. खंडाळा गावच्या हद्दीतील निरा उजवा कॅनॉलमध्ये 8 जून रोजी अनोळखी मृतदेह आढळून आला होता. आरोपीने या मृतदेहाची ओळख नष्ट केली होती. अशा प्रकारचा हा क्लिष्ट स्वरूपातील खुनाचा गुन्हा लोणंद पोलिसांनी उघडकीस आणून आरोपीस अटक केली.
वैभव सुभाष जगताप (वय 28 वर्ष रा.पांगारे ता.पुरंदर जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मंगेश सुरेंद्र पोमण (वय 35, रा. पोमणनगर विपळे ता.पुरंदर जि.पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी वाठार बुद्रुक ता. खंडाळा गावच्या हद्दीतील निरा उजवा कॅनॉलमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहावर कमी प्रमाणात कपडे होते. त्यामुळे त्याची ओळख पटवणे शक्य नव्हते. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कोणतेही धागेदोरे नसताना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासाबाबत योग्य त्यासुचना दिल्या. त्यानंतर सपोनि विशाल के.वायकर, गुन्हे प्रकटीकरण विभाग लोणंद यांनी तांत्रिक विष्लेषणाच्या आधारे आरोपीची नावे निष्पन्न करुन संशयित वैभव जगताप याचा ठावठिकाणा शोधला. पोलीस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने दुचाकीवरून पळ काढला. सपोनि विशाल वायकर व पोलीस स्टाफने फिल्मी स्टाईलने डोंगराळ परीसरात त्याचा पाठलाग करुन त्याला जेरबंद केले.
चौकशीवेळी जगताप उडवाउडविधी उत्तरे देखुन पोलीसांची दिशाभूल करण्याचाप्रयत्न करु लागाला. परंतु इंट्रोगेशन स्किलचा वापर करुन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी खुनाचा छडा लावला. तपसाअंती आरोपी आणि मयत व्यक्ती यांच्यात येरवडा जेल येथे शिक्षा भोगत असताना वाद झाला होता. या वादातून आरोपीने खून केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्हातील आरोपींनी यापूर्वी खुनाच्या गुन्हात येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.