सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / कणकवली:
हरकुळ बुद्रुक येथील संस्थेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या क्वारंटाईन व्यक्तीने कोविड 19 बाबतच्या नियमांचे उल्लंघन करून भारतीय दंडसहितेसह आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकारी हे संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यांचे मुंबईला सतत येणे-जाणे होते. कणकवलीत आल्यानंतर जिल्हय़ातील शासकीय कार्यप्रणालीनुसार त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना संबंधित संस्थेच्या कर्मचारी वसाहतीत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण त्यांच्या आईला कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही त्यांनी संस्थेत कार्यरत स्टाफची मिटिंग घेतली. या मिटिंगला 25 ते 30 कर्मचारी उपस्थित होते. त्यांची आई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी दोन व्यक्ती आईच्या संपर्कात आल्याची खोटी माहिती प्रशासनाला दिली आहे. पण प्रत्यक्षात अनेकजण त्या दोघांच्याही संपर्कात आल्यामुळे त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली असून अन्य काहीजणांना कोरोनाची लागण होण्याची शक्मयता आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी घेण्याचा आर्थिक भुर्दंड शासनावर पडला आहे. हा प्रकार घडून संबंधितांवर राजकीय वरदहस्तामुळे अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. पण त्यांनी केलेल्या कृत्याचा जिल्हा प्रशासनाने विचार करून त्यांच्यावर कोविड 19 बाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करून भारतीय दंडसहितेअंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पडते यांच्यासोबत तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, संदेश पटेल, ऍड. हर्षद गावडे, गीतेश कडू, शेखर राणे, राजू राठोड, प्रमोद मसुरकर, ललित घाडीगावकर, अजीत काणेकर, रुपेश आमडोस्कर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.