प्रतिनिधी/सोलापूर
विजापूर रस्त्यावरील संभाजी तलावाजवळील केटरिंग कॉलेज येथे सुरू असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारास दाखल असलेला कैदी पळून गेला आहे. याबाबत पोलिस शिपाई अविराज सुरेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय कुंडलिक गायकवाड (वय 29, रा. मंगरूळ नंबर 1, ता. माजलगाव) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती.
मोहोळ उपकारागृहात असताना तो कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्याला उपचारासाठी केटरिंग कॉलेज येथे येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी साडे आठ ते पावणे नऊच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी तो बाहेर आला असता शौचालयाच्या खिडकीमधून पलायन केले आहे. अधिक तपास सहायक फौजदार टंकसाळी हे करीत आहेत.