महिलांचा गोंधळ, मागणी पूर्ण न झाल्याने कपडेच उतरविले
वृत्तसंस्था/ मुरादाबाद
कोरोना संसर्गाच्या संशयितांसाठी निर्माण करण्यात आलेल्या क्वारेंटाईन केंद्रांमध्ये दररोज अजब मागण्या केल्या जात आहेत. काही ठिकाणी रोटीच्या जागी पुरी तर काही केंद्रांमध्ये बिर्याणीची मागणी केली जात आहे. परंतु मुरादाबादमध्ये तर कळसच झाला आहे. मुराबादाबाद येथील क्वारेंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या मुंबईतील महिलांनी (बार डान्सर्स) मंगळवारी रात्री बिअरची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी मोठा गोंधळ घातला आहे.
एका महिलेने तर स्वतःच्या 3 वर्षीय मुलाला बाल्कनीतून टांगले आहे. मुलाला खाली फेकण्याची धमकी देत महिलेने मागणी पूर्ण करवून घेण्याचा प्रयत्न केला. या महिलांनी बेजबाबदारपणाचा कळस करत शरीरावरील कपडेच उतरवून नृत्यास प्रारंभ केला. या प्रकारामुळे गोंधळून गेलेल्या कर्मचाऱयांनी महिला पोलीस अधिकाऱयाला बोलावून स्थितीवर नियंत्रण मिळविले आहे.
एमआयटीमध्ये क्वारेंटाईन सेंटर निर्माण करण्यात आले असून यात मुंबईतून मुरादाबाद येथे आलेल्या अनेक महिलांना ठेवण्यात आले आहे. 72 जणांमध्ये 12 मुले, 40 महिला आणि 20 पुरुषांचा समावेश आहे. यातील 20 जणांची चाचणी झाली असता 5 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 5 जणांबरोबरच सर्वांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे.
या महिलांनी वैद्यकीय कर्मचाऱयांकडे बिअरची मागणी केली आहे. या महिलांचा गोंधळ पाहता तेथे महिला पोलीस कर्मचाऱयांची संख्या वाढविण्यात आली आहे. 18 महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना मुलींच्या वसतिगृहात हलविण्यात आले आहे. या महिलांपैकी अनेक जण बारबाला आहेत. यापूर्वी मेरठच्या एका केंद्रात टीव्ही लावण्याची मागणी करण्यात आली होती.