ऑनलाईन टीम / शिमला :
क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने हिमाचल प्रदेश देशात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर गुजरात तर दुसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेश आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये हमिरपुर जिल्हा दुसऱ्या स्थानावर, सिरमौर चौथ्या आणि ऊना जिल्हा दहाव्या स्थानावर आहे.
आकांक्षी जिल्हा योजनेच्या सूचीमध्ये चंबा जिल्हा देशात चौथ्या स्थानावर आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आर डी धीमान यांनी प्रदेशातील सर्व मुख्य चिकित्सा अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग कार्यक्रम अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आढावा बैठक देखील घेण्यात आली. यावेळी धीमान यांनी भारत सरकारकडून ठरवलेल्या 9 मापदंडानुसार प्रदेशात काम चालू आहे की नाही याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पुढे ते म्हणाले, हिमाचल प्रदेशने 9 पैकी 6 निकषांमध्ये देशात सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे. अन्य 3 निकषांवर सर्वांना येणाऱ्या काळात अधिक चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
पुढे ते म्हणाले, आता हिमाचल प्रदेशात आशा कर्मचारी दर रविवारी आपल्या भागातील घराघरांमध्ये जाऊन ज्या लोकांना क्षय रोग होण्याची शक्यता आहे, अशा लोकांचा शोध घेऊन सरकारने येणाऱ्या डिसेंबर 2021 पर्यंत क्षय रोगाचे समूळ उच्चाटन हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सहकार्य करतील. कोविड 19 च्या महामारी च्या काळात अन्य आजारांपासून देखील प्रदेशातील जनतेचे रक्षण करायचे आहे.