वृत्तसंस्था/ तैपैई
4 दशकांनंतर अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या तैवान दौऱयाने चीन संतप्त झाला आहे. या संतापाच्या भरात चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तैवानने प्रत्युत्तर दिल्यावर चिनी लढाऊ विमानांनी पळ काढला आहे. तैवानच्या दौऱयावरील अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व आरोग्यमंत्री एलेक्स अजार करत आहेत.
चीनच्या जे-11 आणि जे-10 लढाऊ विमानांनी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता हद्दीत प्रवेश केला, पण त्यांच्यावर जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रs डागण्यात आली तसेच गस्तविमानांनी पाठलाग सुरू केल्याने चिनी विमानांनी त्वरित पलायन केल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
चीनने तैवानच्या किनाऱयानजीक पाणी तसेच जमीन दोन्ही ठिकाणी संचालित होऊ शकणाऱया युद्धनौका तसेच मोबाइल मिसाइल लाँचर तैनात केले आहेत. तैवानवरील धोका पाहता अमेरिकेच्या नौदलाने या भागातील स्वतःची गस्त वाढविली आहे. तैवान आपलाच हिस्सा असल्याचा दावा चीन करत आला आहे.
तैवानसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन आणि मैत्रीचा संदेश घेऊन येणे खरोखरच सन्मानाची बाब असल्याचे उद्गार अमेरिकेचे आरोग्य मंत्री अजार यांनी काढले आहेत. त्यांनी तैवानच्या अध्यक्षा साई-इंग-वेन यांची भेट घेतली आहे.
तैवानसोबत आर्थिक आणि आरोग्य सहकार्य दृढ करणे तसेच कोरोना महामारीच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय लढय़ात तैवानच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा दौरा होत आहे.