वडूज / प्रतिनिधी :
कोल्हापूर येथे होणार्या पहिल्या विश्वात्मक संतसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खटाव तालुक्यातील नायकाचीवाडी येथील सुपुत्र व अहमदाबाद येथील राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य जेष्ठ किर्तनकार ह.भ.प. मदन गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक डॉ. दत्तात्रय डुंबरे यांनी त्यांचे नाव घोषित केले. विश्वात्मक संत साहित्य परिषद पुणे यांच्याकडून अखिल विश्वातील संतपरंपरेचा अभ्यास व संशोधन केले जाते. कोल्हापूर येथे अलिकडेच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एपूण चार उमेदवारांकडून गोसावी यांच्या नावाची शिफारस परिषदेकडे करण्यात आली होती.
लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये गोसावी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. ‘कोरोना काळात संतसाहित्याने निलेली मनशांती’ या विषयावर या संमेलनामध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय संतसाहित्याची संशोधन केंद्रे जगभर सुरुू व्हावीत, यासाठी विशेष कृतियोजना आखण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विनय देव यांनी दिली.
गोसावी यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायाधीशपदावर काम केले असून, मंत्रालयात विधी आणि न्याय खात्याचे सहसचिव म्हणूनही ते कार्यरत होते. ते सध्या अहमदाबाद येणे राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदसय म्हणून कार्यरत आहेत. या व्यवसायिक कामासोबतच त्यांनी राज्यभर किर्तन, प्रवचनातून जनजागृती केली आहे.