पशुपालकांमध्ये घबराट : मात्र पशुसंवर्धन विभाग अलर्ट
प्रतिनिधी/ वडूज
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील नागरीक अगोदरच हवालदील झाले आहेत. अश्या परस्थितीत जनावरांना सतावणार्या ‘ लंम्पी स्किन ’ आजाराने तालुक्यात शिरकाव केला आहे. वडूज परीसरातील दोन जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वडूज परीसरासह तालुक्यातील पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला असून सर्वत्र लसीकरण सुरु करण्याबरोबरच बाधित परीसरात औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, लंम्पी स्किन या आजाराने गुजरात राज्यात चांगलाच हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा व त्यानंतर सातारा जिह्यातील माण तालुक्यातील म्हसवड परीसरात या आजाराने बाधित जनावरे सापडली होती. आता वडूज परीसरातील गणेशवाडी येथील भिमराव आस्मे व डाळमोडी रस्त्यावरील दिपक तुपे यांच्या गोठय़ातील दोन जनावरांना या रोगाची बाधा झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. ही माहिती समजताच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परीहार, जि. प. चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रभावी उपाय योजना करण्यास प्रारंभ झाला आहे. वडूज येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. सागर दोलताडे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी गोविंद कटरे, डॉ. विश्वास इनामदार, डॉ. हणमंत जाधव, डॉ. तानाजी खाडे, डॉ. प्रकाश बोराटे, डॉ. देवानंद खरात, डॉ. तात्या खाडे, डॉ. चौधरी, डॉ. भिसे व इतर पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी वडूज, गणेशवाडी परीसरात लसीकरणाचे काम हाती घेतले आहे. तसेच परीसरात जंतूनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. याचबरोबर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व इतर पदाधिकार्यांना परीसर स्वच्छतेसंदर्भात उपाय योजनेबाबत पत्रव्यवहार केला आहे.