पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ातील विविध ठिकाणी हमरस्त्यावर प्रवाशांना अडवून त्यांची लुटमार करणाऱया खटाव तालुक्यातील योगेश बाजीराव मदने रा. राजापूर, ता. खटाव याच्यासह त्याच्या टोळीतील चार साथीदारांवर मोक्कांतर्गंत कारवाई पोलीस दलाने गुन्हेगारी विश्वाला आणखीन जोरदार तडाखा दिला आहे. मदने टोळीवरील मोक्का प्रस्तावाला कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी नुकतीच मंजुरी दिली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
या कारवाईनंतर टोळीप्रमुख योगेश मदनेसह टोळीतील त्याचे साथीदार सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर रा. चौधरवाडी, ता. फलटण, प्रथमेश उर्फ सोनू हणमंत मदने रा. उपळवे, ता. फलटण व महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे रा. मोती चौक, फलटण या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पाचवा आरोपी किरण मदने रा. राजापूर, ता. खटाव हा फरारी झालेला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
या टोळीने दि. 23 फेब्रुवारी रोजी वीर धरणावर फिरायला गेलेल्या युवक व युवतीला अडवून त्यांच्याकडील 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेला होता. तर त्याच दिवशी या टोळीने वीर धरण परिसरात जोडप्यास लुटले असल्याची कबुलीही दिली आहे. या टोळीने संघटीतपणे फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच बारामती तालुक्यात रस्त्यावर प्रवाशी, जोडपी यांना अडवून त्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवत, मारहाण करत लुटले आहेत. या टोळीतील गुन्हेगारांवर एकूण 49 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी या टोळीवरील गुन्हय़ांचा तपास करुन त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून या आरोपींवर गुन्हय़ांचा पुढील तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करत आहेत. टोळी प्रमुख योगेश मदने व महेश उर्फ माक्या शिरतोडे यांच्यावर यापूर्वी देखील मोक्काची कारवाई करण्यात आली होती. पण, ते जेलमधून सुटले होते. आता पुन्हा मोक्काची कारवाई त्यांच्यावर झाली आहे.
या कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीला मोक्का लावण्यासाठी पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळे, शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश हजारे, हवालदार प्रवीण शिंदे, पोलीस नाईक अमित सकपाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक वैभव शिंदे, स्वप्नील दौंड यांनी परिश्रम घेतले.