प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील खटाव येथे द्राक्ष बागेत काम करत असताना शॉक लागून परशुराम महादेव मुंजे (वय 21, राहणार मुळे ऐनापुर ता. अथनी) या शेतमजुराचा मृत्यू झाला. बोअरवेलच्या विद्युत केबल वायरला हात लागल्याने ही घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिसांनी पंचनामा पंचनामा केला आहे.
खटाव येथील महादेव रामा भोसले यांच्या शेतात 12 ते 13 मजूर काम करीत होते. द्राक्ष बागेचा जवळून बोअरवेलला जोडलेली एक विद्युत वायर शेतातून गेली आहे. परशराम मुंजे हा शेतात काम करत असताना विद्युत वायरला त्याचा हात लागला. मात्र सदर केबल वायर मधून उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरू असल्याने परशुराम याला जबर शॉक बसला. परशुराम याला शॉक लागल्याचे समजताच शेतात काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांनी येथे धाव घेतली. परशुराम याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती कळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सदर शेतमजुराच्या मृत्यूबाबत पोलिस तपास करीत आहेत.