फोंडा शहरातील इतर रस्त्यांची दुर्दशा कायम : डॉ.केतन भाटीकर यांची टिका
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा शहरात केवळ खडपाबांधकडे जाणाऱया एकमेव मुख्य रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करुन स्थानिक आमदारांनी आपला स्वार्थ साधलेला आहे. शहरातील इतर मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा कायम आहे, अशी टिका मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते हॉटमिक्स होणार अशी जनतेला वारंवार आश्वासने देण्यात आली. पण खडपाबांध सोडून एकाही रस्त्याचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे येथील जनतेला संपूर्ण पावसाळा खड्डय़ातून प्रवास करावा लागणार आहे, असे डॉ. भाटीकर म्हणाले. यावेळी कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी व माजी नगरसेवक शिवानंद सावंत हे उपस्थित होते. फोंडा शहर तसेच कुर्टी पंचायत क्षेत्रातील बहुतेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे. दुर्गाभाट, वारंखडे, प्रभूनगर, सिल्वानगर, सांताक्रूझ यासह कुर्टीतील हवेली, नागझर, बाबल्याखली व अन्य भागातील रस्ते वाहतूक करण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. खड्डय़ांमुळे पावसाळय़ात या रस्त्यांची अधिकच बिकट अवस्था झाली आहे. आपल्या निवासस्थानाकडे जाणाऱया खडपाबांध येथील एकमेव मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करुन आमदारांनी आपले हित साधलेले आहे, असे डॉ. भाटीकर म्हणाले. यापूर्वी खराब रस्त्यांवरुन मगो नेते सुदिन ढवळीकरांवर उटसुठ आरोप करणारे आता गप्प का आहेत ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आमदारांकडून सध्या स्वार्थाचे राजकारण सुरु आहे. कोरोनाकाळात चांगली सेवा देणाऱया नगराध्यक्षांना हटवून आपल्या मुलासाठी पालिकेवर नेतृवबदल घडवून आणण्याचा डाव त्यांच्या अंगलट आला. त्यामुळे आता काही नरसेवकांना आमिषे दाखवून व दबाव आणून पुन्हा नगराध्यक्षांना पाडण्याचे राजकारण सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी
फोंडा शहरात लाखो रुपये खर्चून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरापैकी एकही चालत नाही. गोमेकॉतून मूल पळविण्यासारखी एखादी घटना फोंडय़ात घडल्यास पोलिसांनी तपास कुठल्या आधारावर करावा असे डॉ. भाटीकर म्हणाले. शिवानंद सावंत यांनी किर्ती हॉटलजवळील मुख्य रस्त्याचे कंत्राट देऊनही कामाचे आदेश निघाले नसल्याचे सांगितले. सिल्वानगरमधील रस्ता दहा वर्षे हॉटमिक्सच्या प्रतिक्षेत आहे. या रस्त्यावर पावसाळय़ात वाहन सोडाच चालणेही मुष्किल होईल, असे म्हणाले.