मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
राज्यात खनिज महामंडळ स्थापन करण्यासंबंधीची प्रक्रिया आता प्रत्यक्षात मार्गी लागली आहे. त्यासंबंधीची फाईल नुकतीच कायदा विभागाकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
पणजीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. खनिज महामंडळ स्थापन करण्यासंबंधी यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष 2021-22 च्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्र्यांनी, ’गोवा राज्य खनिज महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणाही केली होती. त्याचबरोबर खनिज संसाधन व्यवस्थापन आणि संभाव्य खाण भाग ओळखण्यासाठी खनिज उत्खनन महामंडळ लि. (एमसीएल) या कंपनीकडे सामंजस्य करार करण्यासंबंधीही विचार चालविला होता.
राज्यात खाणी बंद पडल्यामुळे खाण भागातील या व्यवसायाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित लाखो लोकांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोवा सरकार खाणी सुरू करण्यात अपयशी ठरल्यामुळे काही खाण कामगार आणि त्यांच्या नेत्यांनी दिल्लीपर्यंत जाऊन आंदोलनेही केली होती. त्यामुळे केंद्र सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेताना, ’एकतर खाणीचा लिलाव करा किंवा खनिज महामंडळ स्थापन करून स्वतः खाणी चालवा’, असा आदेश दिला होता.
त्यानुसार गत अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ’गोवा राज्य खनिज महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी बोलतांना त्यांनी, खाणींवर अवलंबून असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकार यांच्या मदतीने सदर महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. सदर प्रक्रिया आता मार्गी लागली असून त्यासंबंधी फाईल कायदा खात्याकडे पाठविण्यात आली आहे. त्यावर कायदा खाते आपले मत मांडणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.