खाण-भूगर्भ मंत्री मुरगेश निराणी यांचे स्पष्टीकरण : वाळू पुरवठा सुरळीत करण्यासाठी महामंडळाची स्थापना करण्याचाही विचार
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्यात खनिज मोठय़ा प्रमाणात आहे. त्या सर्व मालमत्तांचा सर्वसमावेशक सर्व्हेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खनिज संपत्तीची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यात किती खनिज संपत्ती आहे, याचा आकडाही मिळणार आहे. संपूर्ण सर्व्हे झाला तर कर्नाटक राज्य सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास खाण व भूगर्भ मंत्री मुरगेश निराणी यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात खाण व भूगर्भ विभागाच्या तसेच इतर अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी ही माहिती दिली. जिल्हय़ामधील वाळू पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी वाळू महामंडळाची स्थापना करण्याचा विचार प्रशासन करत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रेडनुसार वाळूची क्रमवारी ठरविणे तसेच जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून वितरण सुलभ व्हावे, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
खनिज संपत्ती निर्मितीला प्राधान्य दिल्यास रोजगार निर्माण होऊ शकतो. त्यासाठी खनिज संपत्तीचा सर्व्हे करून रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मायनिंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षित मायनिंग तंत्र व प्रगत तंत्रज्ञानाचे त्यामध्ये प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खाण विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना गणवेश, वॉकीटॉकी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या क्वॉरी मालकांनी दंड न भरल्यामुळे त्यांचे परवाने रद्द केले आहेत, त्यांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र दिल्यास परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट करत ड्रोनद्वारे क्रशर क्वॉरींचा सर्व्हे करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्हा खनिज निधीतून उपचार करण्यासाठी आतापर्यंत 1 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. जिल्हय़ातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.