न्यूझीलंडमध्ये मायक्रोवेव बीमद्वारे घरापर्यंत पोहोचणार वीज
माणूस तसेच अन्य उपकरणांना नसणार धोका
वाहिन्यांशिवाय (तारा) वीजपुरवठय़ाची कल्पना आता प्रत्यक्षात येणार आहे. आगामी काही महिन्यांमध्ये न्यूझीलंडची एमरोड कंपनी, ऊर्जा वितरण कंपनी पावरको आणि टेस्ला मिळून याचे परीक्षण करणार आहेत. या तिन्ही कंपन्या ऑकलंडच्या एका बेटावरील एका सौर प्रकल्पातून अनेक किलोमीटर अंतरावरील दुर्गम वस्त्यांमध्ये बीम एनर्जीद्वारे वीज पोहोचविण्याची तयारी करत आहेत.
या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत मायक्रोवेवची अत्यंत पातळ बीमच्या स्वरुपात वीज पोहोचविण्यात येणार आहे. पॉवर बीमिंगच्या या प्रक्रियेला यापूर्वीच वापरण्यात आले आहे, पण हे सैन्याशी संबंधित काम आणि अंतराळाशी संबंधित प्रयोगांपुरतीच मर्यादित होते.
1975 मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मायक्रोवेवद्वारे 1.6 किलोमीटर अंतरापर्यंत 34.6 किलोवॅट वीज वाहून नेण्याचा विक्रम नोंदविला होता. पण याचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्यात आला नाही.
प्रारंभी कमी अंतर
प्रारंभिक टप्प्यात 1.8 किलोमीटरपर्यंत काही किलोवॅट वीज पाठविणार आहोत. त्यानंतर हळूहळू अंतर आणि ऊर्जेत वाढ करू. या प्रक्रियेमुळे दुर्गम भागांमध्ये वीज वहन करण्यासाठी वाहिन्यांच्या मोठय़ा खर्चापासून मुक्तता मिळणार असल्याचे उद्गार एमरोड कंपनीचे संस्थापक गेक कुशनिर यांनी काढले आहेत.
आणखीन दोन तंत्रज्ञान
वाहिन्यांशिवार वीज पोहोचविण्याच्या आणखीन दोन तंत्रज्ञानांवर कंपनी काम करत आहे. यातील एक रिले असून हे निष्क्रीय उपकरण आहे, हे लेन्सप्रमाणे काम करते आणि मायक्रोबीमला रिफोकस करून कमीत कमी वहन नुकसानीद्वारे वीज पोहोचविते. तर मेटामटेरियल्स पूर्वीपासूनच क्लोकिंग उपकरणात वापरण्यात येत आहेत. मेटामटेरियन्स युद्धनौका आणि लढाऊ विमानांना रडारपासून वाचविण्यास मदत करतात. तसेच ते विद्युत चुंबकीय तरंगांना वीजेत उत्तमप्रकारे बदलण्यास सक्षम असल्याचे कुशनिर यांनी सांगितले आहे.
अन्य कंपन्याही प्रयत्नशील
एमरोडसह सिंगापूरची ट्रान्सफरफाई, अमेरिकेतील पॉवरलाइट टेक्नॉलॉजीही हवेद्वारे वीज पाठविण्याच्या योजनेवर काम करत आहे. जपानची मित्सुबिशी देखील सौरघटांवरील उपग्रहांद्वारे वीज पुरवठा करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे.
माणसांना जोखीम नाही
हवेत वीज पुरवठा करताना बीम्सचे घनत्व अत्यंत कमी राहणार असल्याने माणूस आणि प्राण्यांवर याचा फारसा प्रभाव पडणार नाही. तरीही खबरदारीदाखल या बीम्सना एका प्रकारच्या लेझरच्या आवरणाने आच्छादले जाणार आहे.