उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
पाऊस व पूरामुळे खराब झालेले रस्ते व पूलांची कामे स्थानिक आमदारांच्या निदर्शनास आणून 22 सप्टेंबरच्या आत सुरु करावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम व समाज कल्याण खात्याचे मंत्री असणारे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना केली.
शुक्रवारी सुवर्ण विधानसौधमध्ये सार्वजनिक बांधकाम व समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत योजनांचा आढावा घेण्यात आला. 22 सप्टेंबरच्या आत रस्ते व पूलांची कामे सुरु करावीत. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली.
बेळगाव विभागात 74 कामांसाठी लागणारी कागदपत्रे तयार करुन टेंडर मागवावे व चिकोडी विभागातील कामांसंबंधी उद्यापर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती द्यावी. विजापूर जिह्यात पावसामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किती निधीची गरज आहे? या संबंधी अहवाल तयार करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी आमदार महांतेश दोड्डगौडर, मुख्य अभियंते एस. एफ. पाटील यांच्यासह गदग, बागलकोट, धारवाड, हावेरी, कारवार, शिरसी विभागातील सार्वजनिक बांधकाम व समाज कल्याण खात्याचे अधिकारी उपस्थित होते. पावसामुळे जिथे जिथे पायाभूत सुविधांची नुकसान झाले आहे ते दुरुस्त करण्यावर अधिकाऱयांनी अधिक भर देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.