सेन्सेक्समध्ये 533 अंकांची वाढ, रियल्टी, धातू क्षेत्राची चमक
वृत्तसंस्था/ मुंबई
ऊर्जा आणि धातू क्षेत्रातील समभागांच्या खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजीसह बहरत होता. गेले चार दिवस होत असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला.
सोमवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 533 अंकांच्या वाढीसह 59,299.32 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 159 अंकांच्या वधारासह 17,691.25 अंकांवर बंद झाला. महत्त्वाचे म्हणजे बाजार सकाळी तेजीसह सुरू झाले. रियल्टी, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांनी सोमवारी भारतीय भांडवली बाजाराला उत्तम आधार दिल्याचे पाहायला मिळाले.
सेन्सेक्समधील 30 पैकी 24 आणि निफ्टीतील 50 पैकी 37 समभाग तेजीसह बंद झाले. पॉवरग्रिड कॉर्प, कोटक बँक, नेस्ले, टायटन, एचयुएल आणि बजाज ऑटोचे समभाग मात्र घसरणीत होते.
समभागांची खरेदी
आठवडय़ाच्या पहिल्या व्यवहारी दिवशी बाजारात चौफेर खरेदी दिसली. बीएसईवर मिड कॅप व स्मॉल कॅप दोन्ही दीड टक्के वाढलेले होते. रियल्टी, धातू आणि ऊर्जा क्षेत्रात 2 टक्के इतकी तेजी दिसली. सेन्सेक्स सकाळी 378 अंकांच्या तेजीसह 59,143 अंकांसह मजबुतीत खुला झाला. त्याला निफ्टीचीही 83 अंकांच्या वाढीसोबत 17,615 अंकांसह उत्तम साथ लाभली.
दुसरीकडे आशियातील बाजारही तेजीसह खुले झाले. चीनमधील बाजार रिअल इस्टेट एव्हरग्रँडच्या अनिश्चिततेमुळे दबावात होता. हाँगकाँग, जपान आणि कोरियातील बाजारही कमकुवत दिसून आले. अमेरिकेतील बाजार शुक्रवारी मजबुतीसह बंद झाले हेते. दरम्यान रिझर्व्ह बँकेची तीन दिवसांची व्याजदराबाबत बैठक येत्या आठवडय़ात होत असून त्याचप्रमाणे विविध कंपन्यांची तिमाही आकडेवारी सादर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजार काहीसा सावरत असलेला
दिसला.