लग्नसराईचा काळ सुरू आहे. लग्न म्हटलं की खरेदी आलीच. त्यातही नवराईची खरेदी तर खास हवी. बाजारात विविध प्रकारचे, रंगांचे आणि स्टाईलचे लेहंगे, साडय़ा, इव्हिनिंग गाऊन मिळतात. पण या खास प्रसंगासाठी तुम्ही एखादं डिझायनर प्रावरण निवडू शकता. डिझायनर कपडे थोडे महाग असले तरी तुमच्या खास दिवसाला ते अधिकच खास बनवून टाकतील. लग्नप्रसंगी तुम्हीही एखादी डिझायनर साडी, लेहंगा किंवा इव्हिनिंग गाऊन घेण्याच्या विचारात असाल तर या टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतील.
* लग्नासाठी डिझायनर कपडे खरेदी करण्याआधी थोडं फार संशोधन करणं आवश्यक आहे. लग्नप्रसंगी तुम्हाला कोणता लूक हवा आहे हे आधी ठरवून घ्या. त्यानुसार कपडय़ांची निवड करा. मुख्य लग्नासाठी साडी आणि स्वागत सोहळ्यासाठी इव्हिनिंग गाऊन किंवा लेहंगा निवडता येईल. तुम्ही वेगवेगळ्या डिझायनर्सच्या कपडय़ांवर नजर टाका. बजेटही ठरवा. तुमच्या बजेटमध्ये बसणार्या आणि अपेक्षांची पूर्ती करणार्या डिझायनरकडून कपडे विकत घ्या.
* डिझायनर कपडे शक्यतो थेट डिझायनरकडूनच खरेदी करणं योग्य ठरतं. डिझायनर्सची दालनं असतात. तसंच ऑनलाईन खरेदीचा पर्यायही मिळतो. मात्र तुम्ही ई कॉमर्स साईट किंवा रिसेलरकडून खरेदी करणार असाल तर दर्जा तपासून घ्या. सिल्कची प्रावरणं हातांवर घासल्यास उष्णता निर्माण होते. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
* डिझायनर कपडय़ांची ऑनलाईन खरेदी करणार असाल तर हे कपडे किती वेळात तुमच्यापर्यंत पोहोचतील याची माहिती करून घ्या. कंपनीची रिटर्न पॉलिसीही तपासून बघा. * डिझायनर कपडय़ांची देखभालही योग्य पद्धतीने करावी लागते. त्यामुळे डिझायनर कपडय़ांची खरेदी करताना त्यांच्या देखभालीचं तंत्रही समजून घ्या.