दागदागिने महिलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. दैनंदिन आयुष्यातही महिला बांगडय़ा, कानातली, मंगळसूत्र, चेन, चमकी, पैंजण असे दागिने घालतात. दागिन्यांशिवाय नटण्यामुरडण्याला काहीच अर्थ राहत नाही. सोन्याचांदीचे दागिने काही खास कार्यक्रमांसाठी असतात. नियमित वापरासाठी आपण आर्टिफिशियल दागिने विकत घेतो. तुम्हालाही दागिन्यांची खरेदी करायची असेल तर या टिप्स उपयुक्त ठरतील.
* प्रत्येक प्रकारच्या पेहरावासोबत शोभून दिसणारे दागिने खरेदी करा. काही दागिने पाश्चात्य तसंच भारतीय पारंपरिक कपडय़ांवरही शोभून दिसतात. अशा प्रकारच्या दागिन्यांना प्राधान्य द्या. सध्या फ्युजनही केलं जातं. त्यामुळे तुम्ही ट्रेंडी दागिने घेऊ शकता.
* बरेचदा आपल्याला सुरूवातीला दाखवलेली वस्तू पसंत पडते. त्या वस्तूवरून नजर हटत नाही. मात्र अजून काहीतरी चांगलं मिळेल असा विचार करून आपण बर्याच वस्तू बघत बसतो. पण यामुळे गोंधळ उडू शकतो. सुरूवातीला आवडलेली वस्तू तुमच्या बजेटमध्ये बसणारी असेल तर ती खरेदी करून टाका. यामुळे तुमचा वेळही वाचेल.
* ‘झिरकॉन’ ज्वेलरी हा प्रकार ट्राय करायला हरकत नाही. या प्रकारचे दागिने सदाबहार असतात. त्यांची फॅशन कधीही जात नाही. हे दागिने घातल्यानंतर तुम्ही ट्रेंडीही दिसता. कमी बजेटमध्ये चांगली झिरकॉन ज्वेलरी मिळून जाईल. * दागिने खरेदी करताना उंची आणि चेहर्याच्या आकाराचाही विचार करा. तुमचा चेहरा छोटा असेल तर फार बटबटीत किंवा मोठे दागिने खरेदी करू नका. तरुण मुली ट्रेंडी ऍक्सेसरीज खरेदी करू शकतात.