सांकवाळ येथील तरुण, क्रूझवरून परत पाठवणी झाल्यानंतर मोदकाला दिला नवीन पैलू
संदीप रेडकर / मडगाव
कोविडच्या महामारीमुळे नोकरीवर आलेले गंडांतर. क्रूझ बोटीवरून परत गोव्यात पाठवणी केल्यानंतर आता पुढे काय करायचे या विवंचनेत असलेले आमचे कित्येक खलाशी. गोव्यात तर नोकऱया नाहीत त्यामुळे आता काय करायचंय यात घुस्पटलेल्या एका 24 वर्षीय पॅटीसियरची (पेस्ट्री करणारा) जिगर आता युवकांना आणि प्रामुख्याने क्रूझ बोटीवर काम करणाऱयांना आदर्शवत ठरली आहे.
साहिल श्याम नाईक या सांकवाळ येथील तरूणाने सध्याच्या भीषण महामारीचा सामना कसा ध्यैयाने आणि सन्मानाने करावा, ऐटीत जगावे अन् आत्मनिर्भर व्हावे, हा संदेशच जणू आपल्या साथीदारांना दिला आहे. संकटे येतात आणि जातातही. संकटाचा सामना ध्यैयाने करावा. वाईट दिवसही जातीलही, मात्र कधी जातील याची वाट न पाहता आपल्यात जी कला आहे तिचा अचूक उपयोग केला तर या महामारीतही सन्मानाने जगणं कठीणही नाहीयं, हे दाखवून दिले आहे.
मोदकाला नवीन पैलू
कार्निव्हल क्रूझ लाईन्समध्ये पॅटीसियर (पेस्ट्री करणारा) म्हणून काम केलेल्या साहिलला विविध पॅस्ट्री बनविण्याचे जबरदस्त ज्ञान असून या संबंधी त्याने विविध पेस्ट्रीस्ही बनविल्या आहेत. सध्या गणरायाचे आगमन झाल्यामुळे त्याने बनविलेल्या विविध रूचकर आणि स्वादिष्ठ मोदकांना चांगलीच मागणी आलीयं. मोदकांना साहिलने आपल्या शैलीत नवीन पैलू दिले असून ते यंदा मोदक खाणाऱया खवय्यांच्या पसंतीला उतरले आहेत.
मोदकांचे नवीन प्रकार बनविण्यासाठी माझ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी तसेच मला सतत पाठिंबा देणाऱया माझ्या पालकांनी मला यात प्रोत्साहन दिले. पालकांनी मला त्यांच्या मनातलं करियर बनण्यासाठी कधीच फोर्स केला नाही. मला गोड प्रदार्थ आवडतात. एकदा ‘टॅवल चॅनल‘वर केक बनविण्याची स्पर्धा बघत असताना काही शेफ्सनी बनविलेल्या आकर्षक केकस् पाहून मी अचंबित झालो आणि याच क्षणी मी पेस्ट्री शेफ बनून यातच करियर घडविण्याचे ठरविले. मला पेस्ट्री शेफ बनण्याचे आहे हे मी पहिल्यांदा सांगितल्यानंतर माझ्या पालकांनीही मला पाठिंबा दिला.
वाढदिवसासाठी ऑर्डर्स घेऊन सुरुवात
क्रूझ बोटीवरून आल्यानंतर माझ्याकडे कोणतेही काम नव्हते आणि मला बेकार बसायलाही आवडत नव्हते. काहीतरी करायला पाहिजे यासाठी मी वाढदिवसांसाठीच्या पेस्ट्रीचं ऑर्डर घ्यायला सुरूवात केली. त्यापूर्वी लहान प्रमाणात मी बनविलेल्या विविध चॉकलेट्सही लोकांच्या पसंतीस उतरल्याच होत्या. यामुळे समाधान मिळालं आणि स्वतावरील विश्वासही वाढला, असे प्रसिद्ध फूड शेफ संजीव कपूरचा जबरदस्त फॅन असलेला साहिल म्हणाला.
गणपतीसाठी लागणाऱया मोदकाचे स्वरूप तसेच ठेऊन ते नव्या स्वरूपात आणि मोदकांच्या खाद्यात नवीन काही बदल करायचे असे मी ठरवले. माझी आई चांगले मोदक करते आणि तिचेही मार्गदर्शन मला लाभले. मोदकांसाठी असलेले आतील खाद्य विविध पद्धतीने करावे, यासाठी चॉकलेट नट्टी, नट्टी खजूर, गुलकंद मिल्की, ऑरेंज गनाश आणि चॉकलेट आल्मोंड अशी मोदकांना नावेही दिली. हे मोदकांचे नवीन प्रयोग खवय्यांची पसंतीस अपेक्षेपेक्षा अधिक उतरले असल्याचे हयात गटाच्या ‘ग्रँड हयात‘ या तारांकित हॉटेलात दोन वर्षे काम केलेला साहिल नाईक म्हणाला.
चिखलीतील विद्यामंदीरमध्ये आपले शालेय, जुवारीनगरातील एमईएस उच्च माध्यमिक स्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साहिलला शेफ होण्याची आवड निर्माण झाली. शेफमध्येच आपलं करियर करण्याचे ठाम विचार त्याच्या डोक्यात बसल्याने त्याने वाट पकडली ती गोवा कॉलेज ऑफ हॉस्पिटेलिटी अँड कुलिनरी एज्युकेशनमध्ये बीबीए करण्याची.
ग्राहकाचे समाधान हीच कामाची पावती
कार्निव्हल क्रूझ आणि कार्निव्हल ड्रिम्स या दोन्ही क्रूझ बोटीवर पेस्ट्री शेफ म्हणून काम केलेला साहिल आपल्या कामाबद्दल प्रामाणिक आहे. क्रूझवर येणाऱया आपल्या ग्राहकांचे समाधान हीच आम्हाला आमच्या चांगल्या कामाची पावती असल्याचे तो म्हणाला. आम्ही त्यांना करून दिलेल्या पेस्ट्रीस खाल्यानंतर त्यांच्या चेहऱयावर आलेले हास्यच आम्ही केलेल्या कष्टाचे समाधान मिळते व ते काही औरच असल्याचे साहिल म्हणाला.
क्रूझ बोटवर काम करणे म्हणजे तिथं चांगला अनुभव मिळतो. नवीन नवीन पेस्ट्रीस शिकायला मिळतात. मला या क्षेत्रात नवीन शिकायचयं. काही वर्षे क्रूझ बोट्सवर काम करायचयं. थोडय़ा प्रमाणात का होईना, मी सध्या माझा लहानसा उद्योगही सुरू केला आहे. देवाच्या कृपेने आणि थोरांच्या आशिर्वादाने पेस्ट्रीचा हा उद्योगही पुढे वाढवायचायं आणि एक रॅस्टॉरंटचीही निर्मिती करायचीयं, असे साहिल नाईक म्हणाला.
कौशल्याचा उपयोग करा
आपल्याकडे असलेल्या कौशल्यांचा उपयोग करा. ‘ग्रँड हयात‘मध्ये असलेले मुख्य शेफ राम यांनी मला या क्षेत्रात चांगले मार्गदर्शन केले. आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱयांना दिलं तर काहीच बिघडत नाही. तुम्हाला जर काही कळत नसेल तर दुसऱयांना विचारण्यास संकोच मानून घेऊ नका. जीवनात आपण कधीच पूर्ण परिपक्व नसतो. शिकणे ही एक सतत प्रक्रिया असते, असे साहिल म्हणाला.
कोविड महामारीमुळे बेकार होऊन घरी बसलेले कित्येक गोवेकर सध्या आहेत. तज्ञ म्हणून क्रूझ बोट्सवर काम करणारे कित्येक जण सध्या गोव्यात आहेत. ते क्रूझवर नाहीतर परदेशात कोणतेही काम करणार मात्र, स्वताच्या गावात त्यांना तेच काम करायला लाज वाटते. साहिल नाईकने महामारीचा प्रादुर्भाव गेल्यानंतर परत एकदा क्रूझवर जाण्याचे ठरविले आहे तोपर्यंत अन्य खलाशांपेक्षा वेगळा विचार करणाऱया ‘आत्मनिर्भर‘ साहिल शाम नाईकचा आदर्श इतर खलाशांनी घेतल्यास शासनाला खलाशांना यापुढे बेकारी भत्ता देण्यास लागणार नाही.