बेळगाव / प्रतिनिधी
रोटरी क्लबतर्फे येथील सी. पी. एड. मैदानावर सुरू असलेल्या अन्नोत्सवामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. त्याचबरोबर मनोरंजनाची भव्य पर्वणी रसिकांची मने जिंकून घेत आहे. बेळगावकरांसाठी अप्रतिम अशा विविध पदार्थांची आणि मनोरंजनाची एकत्रित पर्वणी घेऊन अन्नोत्सव बहरला आहे.
अन्नोत्सवामध्ये विविध प्रांतांच्या वेगवेगळय़ा खाद्यपदार्थांची लज्जत चाखण्यासाठी संधी उपलब्ध आहे. पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य, चायनीज, मूघलाई अशा प्रकारांमधील शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकवर्ग गर्दी करीत आहे. त्याचबरोबर मांसाहारी पदार्थांमध्ये मासे, चिकन आणि इतर चमचमीत पदार्थ उपलब्ध आहेत. लोकप्रिय अशा बिर्याणीचे वेगवेगळे नमुने चाखण्याची संधी आहे. आईस्क्रीम, भेळपुरी, छोले, भटुरे आणि इतर चटकदार पदार्थांचे स्टॉल्सही येथे मांडण्यात आले आहेत.
नामवंत जादूगार प्रेमानंद यांनी यावेळी अन्नोत्सवात मनोरंजनासाठी असणाऱया व्यासपीठावर जादूचे प्रयोग सादर करून रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर फनफेअरमधील अनेक खेळप्रकार देखील बालचमूच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. नागरिकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रविवार दि. 19 पर्यंत हा अन्नोत्सव सुरू राहणार आहे. बुधवार दि. 15 रोजी बॉलिवूड मिडले हा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.