वार्ताहर/ माशेल
खांडोळा सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयासाठी मैदानासह आवश्यक त्या सर्व साधनसुविधा असलेला सुसज्ज इमारत प्रकल्प उभारण्यात येणार असून येत्या तीन महिन्यांत त्याची पायाभरणी होणार आहे. याठिकाणी नवीन हायस्कूल सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे, अशी माहिती स्थानिक आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
गणपतीवाडा खांडोळा येथे सुशोभीकरण केलेल्या तळीचे उद्घाटन केल्यानंतर प्रसार माध्यमासमोर ते बोलत होते. प्रियोळ मतदारसंघाचा विकास हा नियोजनबद्ध पद्धतीनेच सुरु असून त्याची कुणी काळजी करायची गरज नाही. खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयात 900 विद्यार्थी शिकतात. त्यांच्यासाठी सुसज्ज अशी इमारत उभारतानाच चांगले मैदानही उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षण खात्याच्या माध्यमातून त्यासाठी जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी तब्बल साडेतीन वर्षे आपला प्रयत्न सुरु होता. येत्या दोन ते तीन महिन्यात या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. आज आपल्यावर टिका करणाऱया मागील आमदारांना गेली दहा वर्षे जे शक्य झाले नाही ते आपण गेल्या चार वर्षात करून दाखविलेले आहे. विकासकामांचे नियोजन कसे करायचे हे त्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही, असे गोविंद गावडे म्हणाले. बेतकी खांडोळा पंचायत क्षेत्रात हायस्कूल नव्हते जे या नवीन शैक्षणिक प्रकल्पात सुरु होणार आहे. त्यासाठी आवश्यक परवानगीही मिळालेली आहे. कोरोनाचे सावट कमी होताच पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्गही सुरु होऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
तर मग मलनिस्सारण प्रकल्प का बंद केला नाही !
खांडेपार येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला होणारा विरोध हा निव्वळ राजकीय आहे. काही पक्षाचे लोकच स्थानिकांची दिशाभूल करून या प्रकल्पाविरोधात त्यांना भडकावित आहेत. एखाद्या प्रकल्पाला निष्कारण विरोध होत असेल तर तो बंद करणे हा उपाय नाही. तसे असल्यास उंडिर बांदोडा येथे मलनिस्सारण प्रकल्पाला प्रखर विरोध झाला होता. मग तो रद्द का केला नाही? असा प्रश्न गोविंद गावडे यांनी उपस्थित केला. खांडेपारच्या पाणी प्रकल्पामुळे पूर किंवा पर्यावरणीय प्रश्न मुळीच निर्माण होणार नाहीत. स्थानिकांना तसे वाटत असल्यास त्यांच्याशी आपण जाहीररित्या या प्रकल्पावर चर्चा करायला तयार आहे. खांडेपार नदीवर 18 बंधारे असून त्यामुळे अद्याप कुठल्याच समस्या निर्माण झालेल्या नाहीत. हा विरोध निव्वळ राजकीय आहे. स्थानिकांनी त्याला बळी पडू नये, असे गोविंद गावडे म्हणाले.
तळीचा वापर गणपती विसर्जन व शेतीसाठी गणपतीवाडा खांडोळा येथे सुशोभीकरण केलेल्या तळीचे काम जलसंवर्धन खात्यातर्फे पूर्ण करण्यात आले असून गणपती विसर्जनाबरोबरच शेती बागायतीसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. बेतकी खांडोळा भाग कृषी प्रधान आहे. येथील नैसर्गिक जलस्रोतांचा पिण्याच्या पाण्यासाठी व शेती बागायतीसाठी वापर करण्यासाठी आपली योजना असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच दिलीप नाईक, स्थानिक पंचसदस्य मुक्ता नाईक, सावईवेरेचे सरपंच सत्यवान शिलकर, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे व अन्य पंचसदस्य उपस्थित होते.