वार्ताहर /माशेल :
बेतकी खांडोळा पंचायत क्षेत्रात 93 लाख खर्चुन कार्यान्वित केलेल्या नवीन वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन स्थानिक आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. खांडोळा येथील सातेरी मंदिरजवळ हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे.
यावेळी बेतकी खांडोळाचे सरपंच दिलीप नाईक, माशेलच्या सरपंच उन्नती नाईक, पंचसदस्य मुक्ता नाईक, उपसरपंच जयेश नाईक, पाईक गावडे, वीज खात्याचे अभियंते कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. खांडोळा भागात कमी दाबाच्या वीज पुरवठय़ामुळे वारंवार वीज प्रवाह खंडित व्हायचा. त्यामुळे या भागात नवीन वीज ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जायची. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. प्रियोळ मतदारसंघात वीज उपकेंद्राची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच हे केंद्र सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वीज ट्रान्सफॉर्मरमुळे खांडोळा भागातील नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत झाल्याबद्दल सरपंच दिलीप नाईक यांनी मंत्री गोविंद गावडे यांचे आभार मानले.