प्रतिनिधी / विटा
राज्यातील खाजगी सुतगिरणी संघटनेच्या पदाधीकाऱ्यांची बैठक कुर्डुवाडी येथील विठ्ठल कार्पोरेशनच्या कार्यस्थळावर पार पडली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार संजयमामा शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी राज्यातील विविध खाजगी सूतगिरण्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
असमान पातळीवरच्या स्पर्धेने खाजगी सुतगिरण्या नुकसाणीमुळे बंद पडण्याची भिती आहे. साहजिकच खाजगी सुतगिरण्यांचे संचालक अस्वस्थ झाले होते. वास्तविक पाहता शासनाला सहकारी आणि खाजगी भेदभाव करता येणार नाही, असा निकाल औरंगाबाद उच्च न्यायालयाने साखर कारखान्यांच्या अशाच प्रश्नामध्ये २०१५ मध्ये दिलेला आहे. त्यामुळे राज्य शासन पुन्हा असा भेदभाव करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे, असे किरण तारळेकर यांनी म्हंटले आहे.
या पार्श्वभुमीवर राज्यातील खाजगी सुतगिरणी संघटनेच्या पदाधीकाऱ्यांची कुर्डुवाडी येथील विठ्ठल कार्पोरेशनच्या कार्यस्थळावर आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. बैठकीत आमदार संजयमामा शिंदे यांचे नांव अध्यक्षपदी सर्वानुमते निश्चित करण्यात आले. खाजगी सुत गिरण्यांचे विविध प्रश्न आणि सहकारी खाजगी भेदभाव दुर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसोबत एका व्यापक बैठकीचे आयोजन करु, असे नूतन अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष, त्रिमुर्ती स्पिनर्सचे उल्हासराव सुर्यवंशी, विराज स्पिनर्सचे किरण तारळेकर, विठ्ठल कार्पोरेशनचे संजय जमदाडे, अरविंद ग्रुपचे शामसुंदर मर्दा, त्रिमुर्ती स्पिनर्सचे भुषण म्हेत्रे, लक्ष्मी काॅटस्पिनचे संजय राठी, औताडे स्पिनर्सचे सुनिल कमते, धनस्मृती स्पिनर्सचे आबासो कोटकर आणि इंडिया टेरीटाॅवेलसह अनेक सुतगिरणी प्रतिनिधींची उपस्थिती होती.