खाण महामंडळ स्थापनेची माहिती सरकार सादर करणार
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील खाणी संदर्भात न्यायप्रविष्ठ असलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी आता येत्या मंगळवारी दि. 13 जुलै 2021 रोजी ठेवण्यात आली आहे. त्यावेळी खाण महामंडळाच्या स्थापने सांबंधिची माहिती गोवा सरकारच्यावतीने सादर केली जाणार आहे.
खाणीसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी प्रतिक्षेत होती पण न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने उर्वरित याचिका येत्या मंगळवारी सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. गोव्यातील खाण व्यवहार सुरु करायचा झाल्यास खाणीच्या लिलावापासून ते पर्यावरणीय ना हरकत दाखला ते परवान्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. खाणींचा लिलाव गोवा सरकारला आणि खाणमालकांना नको आहे, याची कल्पना सर्वोच्च न्यायालयाला दिली जाणार असून पुढील सुनावणीवेळी गोवा सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.