प्रतिनिधी/ पणजी
गोवा मायनिंग पिपल्स प्रंटच्या शिष्टमंडळाने मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन खाणीवर कायमस्वरुपी तोडगा काढून त्या तातडीने सुरु करण्याची मागणी केली. डॉ. सावंत यांनी त्यासाठी वेळ मागून घेतली असून मुख्य सचिव परतल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेण्याची सूचना शिष्टमंडळास केली आहे.
प्रंटचे अध्यक्ष पुती गांवकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने डॉ. सावंत यांच्याकडे चर्चा केली. एकतर एमडीआर कायद्यात दुरुस्ती करा किंवा सुप्रिम कोर्टात तरी त्यावर तोडगा काढा अशा सूचना प्रंटने केल्या. काहीतरी करा पण एकदाच्या खाणी सुरु करा, अशी मागणी करण्यात आली.
गोवा मायनिंग पिपल्स प्रंटच्या शिष्टमंडळाने खाण उद्योग याच हंगामात सुरु करा अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे लावून धरली तेव्हा ऍडव्होकेट जनरल, मुख्य सचिव, खाण सचिव व इतर संबंधित लोकांची पुढील आठवडय़ात बैठक घेऊन हा विषय पुढे नेण्याचे आश्वासन डॉ. सावंत यांनी शिष्टमंडळास दिले.
खूप वर्षे झाली खाणी बंद आहेत आणि लोकांना काम नाही. परिणामी अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले असून कर्जाचे डोंगर उभे झाल्याचे शिष्टमंडळाने डॉ. सावंत यांच्या निदर्शनास आणले आणि विनाविलंब खाणी सुरु करा, अशी मागणी केली.