अवचारहट्टीनजीक घटना : फोटोशूटसाठी राजहंसगडावर गेले होते परिसरात हळहळ
प्रतिनिधी /बेळगाव
फोटोशूटसाठी राजहंसगडावर गेलेल्या हिंदवाडी-शहापूर येथील दोन तरुणांचा क्वॉरीत बुडून मृत्यू झाला आहे. अवचारहट्टीजवळ ही घटना घडली असून रात्री दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
गणेश शाम कांबळे (वय 17) रा. सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी, तेजस चार्लीज यलकपाटी (वय 19) रा. पी. के. क्वॉर्टर्स, शहापूर अशी त्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी क्वॉरीतील पाण्यात या दोघांनी उडी मारली. मात्र त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंडा, अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी जवानांनी मोहीम हाती घेतली. व रात्री उशिरा गणेश आणि तेजसचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार गणेश व तेजस हे दोघे फोटोशूटसाठी राजहंसगडावर गेले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले. तेथून अवचारहट्टीजवळील क्वॉरीत पोहण्यासाठी गेले. त्याचवेळी बेळगाव येथील त्यांचे आणखी काही मित्रही क्वॉरीजवळ पोहोचले. त्याआधीच गणेश व तेजस क्वॉरीत बुडाले होते. तातडीने बेळगाव ग्रामीण पोलिसांना व कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली.