काँग्रेसकडून भाजपला थेट आव्हान पर्रीकरांकडून मोदींसाठी खाणी बंद
प्रतिनिधी /मडगाव
तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी 2012 मध्ये केवळ सत्ता काबिज करण्यासाठी तथाकथित 35,000 कोटींचा खाण घोटाळा जाहीर केला होता. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिंमत असल्यास सदर तथाकथित खाण घोटाळय़ाचा तपशील लोकांसमोर ठेवावा. आजपर्यंत सरकारने त्यातील किती रक्कम वसूल केली हे जाहीर करावे. तथाकथित खाण घोटाळय़ाच्या चौकशीचे काय झाले, हे पण जनतेसमोर ठेवावे असे उघड आव्हान काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.
काल रविवारी नुवे येथे समाजकार्यकर्ते जुझे राजू काब्राल यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री व भाजपवर हल्ला चढविला आणि त्यांनी लोकांची दिशाभूल करणे बंद करावे, अशी मागणी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे सदस्य नोंदणी समन्वयक राजेश ग्रिगलानी, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, गट अध्यक्ष मान्युएल डिकॉस्टा, काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख व संकल्प आमोणकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, जिल्हा पंचायत सदस्य आकुसीना रॉड्रिगीस, झरिना डिकुन्हा, मारियान रॉड्रिगीस, डॉ. आशिश कामत व इतर हजर होते.
मोदी क्रोनी क्लबसाठीस पर्रीकरांचा निर्णय
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खाण व्यवसायावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसून माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी 2012 मध्ये गोव्यातील खाण व्यवसाय मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठीच त्यावेळी तडकाफडकी खाणी बंद केल्या, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.
लेखा समितीचा अहवाल जाहीर करावा
भाजप सरकारने हिंमत असल्यास सदर 35 हजार कोटींच्या घोटाळय़ाचा तपशील जाहीर करावा तसेच स्व. पर्रीकरांनी उल्लेख केलेला लेखा समितीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.
जुझे राजू काब्राल यांच्यासारखेच अनेक युवक आता काँग्रेस पक्षात सामील होत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष बळकट होत आहे. काँग्रेस पक्षाचे दरवाजे दहा पक्षांतर केलेल्या आमदारांसाठी कायमचे बंद झाल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.
भाजपने इंटरनेट सेवेचा विस्तार का केला नाही? : कामत
भाजपने गोवा राज्याला दिवाळखोर केले असून निवडणुकीच्या वेळेला दिलेले एकही वचन भाजपने पाळलेले नाही. काँग्रेस सरकारने 2011 मध्ये प्रत्येक पंचायतीकडे नेलेल्या इंटरनेट सेवेचा भाजपने मागील नऊ वर्षात का विस्तार केला नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे अशी मागणी दिगंबर कामत यानी यावेळी बोलताना केली.
लोकांचा आवाज बनून कार्य करणार : काब्राल
जुझे राजू काब्राल यांनी यावेळी बोलताना आपण नुवेच्या लोकांचा आवाज बनुन कार्य करणार असल्याचे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
माजी मंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी राजू काब्राल यांचे स्वागत करताना नुवेत काँग्रेस पक्ष आता अधिक बळकट होणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाने आता आपला जनसंपर्क वाढवला असुन, आम्ही प्रत्येक युवकाकडे संपर्क वाढवत आहोत. युवकांचे प्रश्न सोडवणे व त्यांना रोजगार देणे यावर आमचा पक्ष बंधनकारक असल्याचे संकल्प आमोणकर म्हणाले.
महिला अध्यक्ष बिना नाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जिल्हा पंचायत सदस्य आकुसीना रॉड्रिगीस व इतरांची यावेळी भाषणे झाली. गट अध्यक्ष मान्युएल डिकॉस्ता यांनी स्वागत केले. काल डिजीटल माध्यमांतून अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.