प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र व राज्य सरकारने लघुउद्योग तसेच व्यवसायांना उभारी देण्याकरिता अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे अद्याप बँक खाते नाही, अशा नागरिकांनी नवीन खाते उघडण्यासाठी शनिवारी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात गर्दी केली होती. एकाचवेळी नागरिकांची गर्दी झाल्याने पोस्ट कर्मचाऱयांचीही धांदल उडाली. 30 हून अधिक काऊंटर सुरू करून नागरिकांची खाती काढण्यात आली.
बँकेमध्ये सध्या नवीन खाते काढण्यासाठी वेळ लागत आहे. तसेच काही बँकांनी सोमवारनंतर नवीन खाते काढून मिळेल, असे सांगितले होते. त्यामुळे अवघ्या 5 मिनिटांमध्ये ऑनलाईन खाते काढणाऱया पोस्ट कार्यालयात नागरिकांची सकाळी 9 पासूनच गर्दी जमली होती. पोस्ट खात्यामध्ये सर्व प्रकारचे अनुदान जमा होऊ शकते. आधारकार्ड, फोटो देऊन हे खाते काढले जावू शकते. हे पूर्णपणे ऑनलाईन असून ग्राहकाला क्मयूआर कोड असणारे कार्ड देण्यात येते. त्यामधून ग्राहक विविध सेवा घेऊ शकतो.
सर्व्हरडाऊनमुळे विलंब
सकाळी 10 पासून गर्दी झाली होती. काऊंटर सुरू करण्यात आले खरे परंतु सर्व्हरडाऊनचा फटका बसला. त्यामुळे नागरिकांना काहीकाळ थांबावे लागले. सर्व्हर नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोस्ट कार्यालयाने व्यवस्था करूनही सर्व्हरडाऊनमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. सर्व्हर सुरळीत झाल्यानंतर पुन्हा खाते काढण्याच्या कामाला सुरुवात झाली.
सोमवारी दुपारपासून काढणार खाती
नागरिकांची सकाळपासूनच गर्दी होत असल्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी पोस्ट कार्यालयाने सोमवार दि. 18 पासून दुपारी 2 ते सायंकाळी 5 यावेळेत खाती काढण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारनंतर केवळ 50 खातीच काढण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी एकाचवेळी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अफवेमुळे झाली गर्दी
ज्याचे पोस्ट कार्यालयात खाते असणार आहे, त्यांना 5 हजार रुपये मिळतील, अशी अफवा काही विघ्नसंतोषी लोकांनी पसरविल्याने पोस्टात शनिवारी गर्दी झाली. प्रत्यक्षात ज्यांच्याजवळ व्यवसायाचा परवाना आहे, त्यांच्या खात्यावरच पैसे जमा होणार आहेत. परंतु अफवेमुळे घरातील प्रत्येकाचे खाते काढले जात आहे. नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता, ज्या व्यवसायांना अनुदान मिळणार आहे, त्यांनीच खाती काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे.