कुलगामधील घटना : सुरक्षा पथकातील जवान हवालदिल
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे शनिवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. सदर दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे असल्याचे उघड झाले असून त्यातील एकजण विदेशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही दहशतवाद्यांची वैद्यकीय चाचणी केली असता दोघांचेही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुरक्षा दलात खळबळ निर्माण झाली आहे.
काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती रविवारी देण्यात आली. शनिवारी सकाळपासून सुरू झालेली ही चकमक रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवानही जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. संबंधित परिसरात दिवसभर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
कोरोनाबाधितांची भारतीय हद्दीत पाठवणी?
वैद्यकीय प्रक्रियेनुसार मृत दहशतवाद्यांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानुसार श्रीनगरमधील सीडी हॉस्पिटलकडून प्रात्प झालेल्या अहवालानुसार दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या अहवालामुळे कारवाईत सहभागी झालेले जवान व पोलीस हवालदिल झाले असून सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. मात्र, यानिमित्ताने पाकिस्तानमधून कोरोनाबाधितांची जाणूनबुजून भारतीय हद्दीत पाठवणी केली जाते काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकाची ओळख पटली
खात्मा करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या दोघांचाही संबंध हिजबुल या संघटनेशी आहे. यामधील एकाचे नाव अली भाई असून दुसऱया दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोविड-19 नियमावलीनुसार बारामुल्ला येथे दोघांच्याही अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
सीआरपीएफ पथकावर ‘आयईडी’द्वारे हल्ला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात रविवारी घडलेल्या आणखी एका घटनेत ‘आयईडी’च्या कमी क्षमतेच्या स्फोटामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. पुलवामातील गोंगू इथे रविवारी सकाळी सुरक्षारक्षक जात असताना ही घटना घडली. सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी ‘आयईडी’ पेरून ठेवले होते. या स्फोटात एका जवानाच्या हाताला दुखापत झाली असून त्याला लष्करी इस्पितळात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर हाती घेण्यात आलेल्या शोध मोहीमेत आणखी स्फोटके नष्ट करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.