वार्ताहर / कुंभोज
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने कॅबिनेट मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2016 मध्ये 828 पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात देण्यात आली होती. त्यामध्ये अंतिम टप्प्यात सर्व गुणवत्ता सिद्ध केलेले (लेखी व मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेले पात्र व पास उमेदवार) एकूण 2903 उमेदवारांची गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 25/ 04 /2019 रोजी सादर केली आहे.
सदरील गुणवत्ता यादीतील एकूण 2903 उमेदवारांपैकी 828 उमेदवार व सदर यादीतील 154 व 636 उमेदवारांना मंत्रिमंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊन पोलिस उपनिरीक्षक पदावर सामावून घेतलेले आहे. या एकूण 2903 उमेदवारांपैकी 828+154+636+10 असे एकूण 1628 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर सामावून घेतलेले आहे परंतु सदर यादीतील उर्वरित 1285 (पात्र व पास) उमेदवारांना पोलीस निरीक्षक पदावर सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय अद्याप झालेला नाही.
सध्या देशभर व महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलिस यंत्रणेवर मोठी जबाबदारी व ताण वाढलेला आहे. तसेच सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या आणखी रिक्त जागा वाढलेल्या आहेत. तरी कोरोना महामारीने उदभवलेली परिस्थिती विचारात घेता उर्वरित पात्र व पास 1285 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर सामावून घेतल्यास ते सर्व 1285 उमेदवार पुढील एक वर्षापर्यंत किमान वेतनावर सेवा करण्यास तयार आहेत. जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरील कोणताही आर्थिक बोजा न पडता अनुभवी पोलीस अधिकारी प्राप्त होऊ शकतात. याप्रकरणी गृहविभागामध्ये फाईल क्रमांक पोलीस 1819/प्र.क्र.222/पोल-5 अ अध्यापावेतो प्रलंबित आहे.
तरी आपण स्वतः लक्ष घालून वरील 1285 उमेदवारांना त्वरित पोलीस उपनिरीक्षक पदावर सामावून घेऊन न्याय द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदेश भोसले यांनी केली. तेव्हा सदर विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष व जेष्ट नेते डी. बी. पिष्टे, कार्याध्यक्ष राम कांबळे, गुंडा इरकर, मोहन चौगुले, सुलतान मुल्ला, सागर भोरे, सज्जाद सुतार, मयूर राजमाने, निलेश शिंगे, टिपू मुजावर आदी उपस्थित होते.