ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच मोदी सरकारने खाद्यतेलासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाम तेलासह अन्य प्रकारच्या खाद्यतेलांवरील आयात शुल्कात प्रति टन 8000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे खाद्यतेलांचे दर आता कमी होणार आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
मागील वर्षभरात खाद्यतेलांच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या होत्या. हे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने त्यावर तोडगा काढत पाम तेलावरील आयात शुल्क प्रति टन 112 डॉलर्सनी, क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रति टन 86 डॉलर्सनी तर क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कातही प्रति टन 37 डॉलरची कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता दिलासा मिळणार आहे.