नवी दिल्ली / वृत्तसंस्था
7 जून म्हणजेच रविवारी जागतिक खाद्य सुरक्षा दिन साजरा करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर एफएसएसएआयकडून एक वेबिनार आयोजित करण्या आले. या वेबिनारमध्ये खाद्य सुरक्षा निर्देशांकाची माहिती देण्यात आली. एफएसएसएआयनुसार या निर्देशांकात मोठय़ा राज्यांमध्ये गुजरातने अव्वल स्थान पटकाविले आहे. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगडने बाजी मारली आहे. तर छोटय़ा राज्यांमध्ये गोवा पहिल्या स्थानी आहे.
या यादीत मोठय़ा राज्यांमध्ये गुजरातनंतर तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रम लागतो. रविवारी एफएसएसएआयकडून दुसऱया राज्य खाद्य सुरक्षा निर्देशांकाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. छोटय़ा राज्यांमध्ये गोव्यानंतर मणिपूर आणि मेघालयाचा क्रमांक लागतो. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगडनंतर दिल्ली आणि अंदमान निकोबार बेटसमुहाला स्थान प्राप्त झाले आहे.
खाद्य सुरक्षा सर्वांची जबाबदारी आहे. सुरक्षितप्रकारे धान्य उगविणे, सुरक्षेसह त्याची साठवणूक आणि योग्यप्रकारे सेवन व्हावे याकरता सर्वांनी एकजूट होण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. एफएसएसएआयने कोरोना संकटादरम्यान योग्य खाद्यपदार्थांचा आहार घ्या अशा शीर्षकासह नागरिकांसाठी एक ई-हँडबुक प्रसिद्ध केले आहे. यात सुरक्षित आहाराच्या सवयीवर भर देण्यात आला आहे. तसेच आरोग्य आणि पोषणासंबंधी काही बाबी नमूद आहेत.
मुले सुधारणांचे माध्यम
सुधारणा घडवून आणण्यासाठी मुले माध्यम ठरू शकतात. मुलांना आणि तरुणाईला खाद्यसुरक्षेसंबंधी माहिती दिल्याने भविष्यातील पिढीचा लाभ होणार आहे तसेच आमच्या सवयी देखील बदलतील असे उद्गार आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी काढले आहेत. रेस्टॉरंट आणि खाद्यसेवेत पुरेसे बचावाचे उपाय केले जावेत. सध्या आम्हाल समाजमाध्यम आणि उर्वरित संपर्कसाधनांद्वारे खाद्यसुरक्षा सुनिश्चित करावी लागणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रीति सूदन यांनी म्हटले आहे.